coronavirus: रायगड जिल्ह्यात गंभीर रुग्ण १२ टक्क्यांनी वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 01:43 AM2020-12-10T01:43:10+5:302020-12-10T01:45:22+5:30
Raigad coronavirus: कोरोना विषाणूची दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला काही प्रमाणात यश आले असले तरी दमा, हायपर टेंन्शन, हृदयविकाराच्या आजारांनी डोके वर काढले आहे.
अलिबाग : कोरोना विषाणूची दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला काही प्रमाणात यश आले असले तरी दमा, हायपर टेंन्शन, हृदयविकाराच्या आजारांनी डोके वर काढले आहे. दिवसाला सात ते आठ गंभीर स्वरूपाचे रुग्ण उपचार करून घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होत आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण सध्या कमी झाले आहे. कोरोना रुग्णांसाठी सध्या १ हजार १९१ ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले असल्याने ११२ ऑक्सिजन बेडचा वापर होत आहे. त्यामुळे कोरोनासाठीचे ७० टक्के बेड रिकामे राहिले आहेत. इतर गंभीर आजारांमध्ये मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, किडनीच्या विकारांनी सध्या डोके वर काढले आहे. ताणतणाव, चुकीचा आहार आणि आरामदायी जीवनशैली यांच्यामुळे आज समाजात हृदयविकाराची समस्या झपाट्याने वाढत चालली आहे. विशेषतः सध्याच्या परिस्थितीत, कोरोनाच्या साथीच्या निमित्ताने कोणती औषधे घ्यावीत, रोग कसा टाळावा, त्याची लक्षणे अशा माहितीची देवाण-घेवाण प्रचंड प्रमाणात होत आहे. अशा प्रसंगी, हृदयविकाराची खरी लक्षणे ओळखणे, उच्च रक्तदाबाचा धोका कोणता आणि त्यामध्ये कोरोनाचा संबंध कसा येतो, याविषयी खरी माहिती रुग्णांना मिळणे आवश्यक आहे.
सततच्या बदलत्या हवामानामुळे थंडी-तापासह, घसादुखी आणि खोकला यांची तक्रार करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसते. हे आजार गंभीर नसले तरी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची लागण इतरांनाही होऊन रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती असल्याचे डॉक्टर सांगतात. खासगी दवाखान्यांपासून मोठ्या रुग्णालयांपर्यंत सर्वच ठिकाणी तापाचे रुग्ण आहेत. त्वचाविकारांची संख्याही वाढली असून मिश्र हवामानाचा परिणाम त्वचेवर होत आहे.
उन्हाच्या तडाख्यानंतर घटणारे हवामान हा कालावधी नेहमीच संसर्गजन्य रोगांच्या प्रसाराचा ठरतो. मात्र यंदा अजूनही अपेक्षित थंडी न पडल्याने हवामानाच्या या बदलत्या वेळापत्रकामुळे रोगराई वाढली आहे. घसादुखी, खोकला यांसारखे आजार सामान्य असल्याने घाबरून जाऊ नये, मात्र केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता वैद्यकीय सल्ला घ्यावा.
- डाॅ. राजीव तंबाळे, वैद्यकीय अधिकारी
दररोज ३० ऑक्सिजन सिलिंडरचा वापर
मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, किडनीच्या विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना दररोज ३० ऑक्सिजन सिलिंडरचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाबरोबर आता इतर गंभीर आजाराच्या रुग्णामध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली असल्याने आता डाॅक्टरांवरही अधिक भार येऊ लागला आहे.