Coronavirus: पनवेल, उरणमध्ये कोरोनाचे सहा रुग्ण वाढले; रायगड मधील रुग्णांची संख्या 28
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 07:05 PM2020-04-12T19:05:31+5:302020-04-12T19:31:36+5:30
या नव्या रुग्णांमध्ये खारघर मधील दोन, कळंबोली व तळोजे मधील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
वैभव गायकर
पनवेल :पनवेल , उरण याठिकाणी रविवारी नव्याने सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 28 वर पोहचला आहे.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 4 तर उरण मध्ये 2 अशा सहा रुग्णांची कोविड 19 टेस्ट पॉसिटीव्ह आली आहे.
या नव्या रुग्णांमध्ये खारघर मधील दोन, कळंबोली व तळोजे मधील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. यापैकी खारघर शहरातील नागरिकाचा परदेशी प्रवासाचा इतिहास आहे.22 व्या दिवशी त्याची कोविड 19 टेस्ट पॉसिटीव्ह आली आहे.त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खारघर व कळंबोली मधील उर्वरित दोन रुग्णांवर अपोलो हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत. यापैकी खारघर मधील रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. नवी मुंबई मधील एका रुग्णालयात काम करणारा तरुणाची देखील कोविड 19 टेस्ट पॉसिटीव्ह निघाली आहे. हा तळोजा वसाहती मधील रहिवासी आहे. हा रुग्ण बेलापूर मध्येच कोरंटाईन होता.पनवेल परिसरात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.उरण मध्ये नव्याने दोन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एक तरुण व एक सीआयएसएफ जवानाच्या पत्नीचा समावेश आहे. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख व प्रांत अधिकारी हे युद्धपातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे अवाहन हे अधिकारी करीत आहेत. चार रुग्ण वाढल्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या 22 झाली आहे. तर रायगड जिल्ह्यातील उरण ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या ६ झाली आहे आहे.
पनवेल मध्ये अद्याप चाचणी केलेल्या 325 नागरिकांचे कोविड 19 टेस्ट करण्यात आली आहे.यापैकी 270 नागरिकांची टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत.विशेष म्हणजे पनवेल परिसरातील होम कोरंटाईन केलेल्या नागरिकांची संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. पनवेल परिसरात सध्याच्या घडीला होम कोरंटाईन केलेल्या नागरिकांची संख्या 1700 झाली आहे. 14 दिवसांचा होम कोरंटाईनचा कार्यकाळ सुमारे 28 दिवसांवर करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला असून होम कोरंटाईन केलेल्या नागरिकांनी 28 दिवस घरीच थांबावे असे अवाहन आयुक्त देशमुख यांनी केले आहे.
कोरोना बाधित रुग्ण -28(पनवेल 22 + रायगड ग्रामीण 6)
खारघर -6
कामोठे -3
कळंबोली -12
तळोजे -1
रायगड ग्रामीण -6
बरे झालेले रुग्ण -4
मृत्यू -1
होम कोरंटाईन -1700