उरण : सरकारने सोमवारपासून दारू विक्रीसाठी सवलत दिली आहे. लॉकडाउन दरम्यान तब्बल सुमारे ४५ दिवसांपासून बंद असलेली दारूची दुकाने उघडणार, या आशेवर उरणमध्ये दारू खरेदीसाठी तळीरामांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. मात्र उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सील तोडून दारूची दुकाने उघडण्यासाठी उरणमध्ये पोहोचलेच नसल्याने तळीरामांचे घसे कोरडेच राहिले.लॉकडाउन, संचारबंदी दरम्यान दारूविक्री बंद करण्यात आल्याने तळीरामांच्या घशाला कोरड पडली होती. अनेकांनी छुप्या मार्गाने दारू विक्री-खरेदी सुरू केली होती. सोमवारपासून काही झोनमध्ये दारू विक्रीसाठी शासनाने परवानगी दिली आहे.
शासनाने सवलत, शिथिलता दिल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी दारूची दुकाने उघडतील, अशी अपेक्षा तळीरामांना होती. त्यासाठी सकाळपासूनच शहरासह ग्रामीण भागातही दारू दुकानांसमोर मोठी झुंबड उडाली होती. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचीही पायमल्ली होताना दिसली. दारू खरेदीसाठी झालेली गर्दी पाहून पोलीसही हतबल दिसत होते. काही ठिकाणी पोलिसांनी तळीरामांच्या बेशिस्तपणाला आवर घालण्याचा प्रयत्न केला.
बंद असलेली दारूची सीलबंद दुकाने उघडण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी आलेच नाहीत. त्यामुळे दारू खरेदीसाठी सकाळपासून जमलेली गर्दी आपसूकच हळूहळू ओसरल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी दिली. त्यानंतरही सायंकाळी दुकाने उघडतील या आशेवर काही तळीराम दुकानासमोर घुटमळत होते.पेणमध्ये तळीरामांच्या आनंदावर पडले विरजणरायगड जिल्हा आॅरेंज झोनमध्ये समाविष्ट होऊनही मद्य खरेदी करण्यासाठी बाजारातील मद्य विक्री दुकाने न उघडल्याने तळीरामांना रिकाम्या हाती परतावे लागले. सोमवारी सकाळी ९ वाजता खरेदी करण्यासाठी आलेल्या तळीरामांचा काहीसा हिरमोड झाला.सोमवारी पेण बाजारात सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यतचे सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्याचे एकंदरीत चित्र पाहायला मिळाले होते. केंद्र व राज्य सरकारने कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाढता फैलावर पाहता दररोज कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता १७ मेपर्यंत लॉकडाउन वाढविले आहे. याशिवाय मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात पेण शहर व संपूर्णपणे तालुक्यातील ग्रामीण भागातील गावे व वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. पनवेल ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केला आहे. पनवेल महापालिका क्षेत्राचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पनवेल वगळता रायगड जिल्ह्याचा आॅरेंज झोनमध्ये समावेश करण्यात आलेला असताना आपल्याला सामानाची खरेदी करता येणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी पेणच्या बाजारात गर्दी केली होती. मात्र पेण नगरपरिषदेने दुपारी १ वाजता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी नियमावली व दंडात्मक कारवाई करण्यासंदर्भात दवंडी देण्यासाठी सुरुवात केली होती. तोपर्यंत गावाकडील नागरिकांनी घरचा रस्ता धरला होता.वाइन शॉपवर तळीरामांच्या रांगामहाड : तब्बल ४५ दिवसांच्या लॉकडाउननंतर शासनाने दारूची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने सोमवार अखेर तळीरामांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. वाइन शॉप सुरू होणार अशी माहिती मिळताच सकाळपासूनच दुकानाबाहेर तळीरामांनी एकच गर्दी केली होती. दुकानांसमोर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत चौकोनांची आखणी करण्यात आली आहे. ग्राहकांना सुरक्षित अंतराचा नियम पाळण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या होत्या. यावेळी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस तैनात होते.