रोहा : रोहा तालुक्यात शनिवारी एकाच दिवशी १५ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याची माहिती रोहा तहसील कार्यालयाकडून देण्यात आली. यामध्ये बहुतांश रुग्ण रोहा शहर आणि परिसरात राहत आहेत. सुदर्शन कंपनीतल्या दहाच्या दहा जण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याने, सुदर्शनने रोह्यात कोरोनाचा विस्फोट केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. ही कंपनी आता दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहे.
रोहा तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरात संपर्कात आलेले २ जण, सुदर्शन कंपनीतील आणखी १० जण कोरोनाबाधित झाले असून, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या दोघींंचा त्यात समावेश आहे. सुदर्शन कंपनीतील कामगारांचा आकडा खूप जास्त असून, तो अधिक वाढण्याची भीती कामगार वर्गातूनच व्यक्त होत आहे. परिणामी, शुक्रवारी कंपनीतील बहुसंख्य कामगारांनी कामावर जाण्याचे टाळले. त्याचबरोबर, कंपनी गेटवर ग्रामस्थांनी केलेला हंगामा आणि रोह्यात सर्वत्र सुदर्शनबाबत संताप व्यक्त असल्याने सायंकाळी कंपनी दोन दिवस बंद ठेवण्यात येत असल्याचे कामगारांना सांगण्यात आले. आढळून आलेले कोरोनाबाधित हे रोहा अष्टमी, वरसेमध्ये राहतात. परिणामी, रोहा, वरसे, धाटाव पंचक्रोशीत भीतीचे वातावरण आहे. हे संकट दूर होताच, एमआयडीसीमधील कामगार कंपनीविरोधात आंदोलन करतील, असा इशारा कामगार समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश मगर यांनी दिला आहे.कामगार आजारी असल्याची कल्पना असतानाही सुदर्शनने बेजबाबदारपणे उत्पादन सुरू ठेवून कामगारांसह तालुक्यातील जनतेला अडचणीत आणले. सुदर्शनची चौकशी करून कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा. - नितीन परब, अध्यक्ष रोहा तालुका सिटीझन्स फोरमसुदर्शनच्या स्वार्थीपणामुळे तालुक्यात कोरोना आजाराचा भडका उडाला आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून, येथील कामगार वर्ग त्यामुळे अडचणीत सापडला आहे. यासाठी सुदर्शनला पाठीशी घालणारे राज्य सरकारही तेवढेच दोषी आहे.- अमित घाग, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चारोहा तालुक्यात कोरोना विषाणूची आग सुदर्शनने भडकाविली. सुदर्शनच्या चुकीमुळे असंख्य लोकांचे रोजगार बुडणार असून, बाजारपेठ, दुकाने, धंदे बंद राहिल्याने नुकसान होणार आहे. कामगारांमध्ये लक्षणे दिसून येत असतानाही कारखाना बेकायदेशीरपणे चालू ठेवणारे सुदर्शनला पाठीशी घालणारे नेते, जिल्हा प्रशासन व कंपनी मालक याला जबाबदार आहेत. - सुरेश मगर, अध्यक्ष रोहा तालुका कामगार समन्वय समिती