Coronavirus: गावी परत जाण्यासाठी जेएसडब्ल्यूतील हजारो कामगारांचा उठाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 01:06 AM2020-05-05T01:06:07+5:302020-05-05T01:06:27+5:30
ठेकेदार, कामगारांचा उद्रेक : सुरक्षा विभागाची उडाली तारांबळ; रायगड पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वातावरण निवळले
अलिबाग : लॉकडानमध्ये अडकलेल्या जेएसडब्ल्यूने नेमलेल्या ठेकदारांच्या कामगारांना आपल्या गावी परत जायचे असल्याने त्यांनी आज वडखळ येथील कामगार कॉलनीमध्ये उठाव केला. या उठावामध्ये हजारो कामगारांनी सहभाग घेतल्याने कंपनीच्या सुरक्षा विभागाची चांगलीच तारांबळ उडाली.
काही कालावधीत तेथे रायगड पोलिस पोचल्याने परिस्थीती नियंत्रणात आली आहे. कामगांराना आपापल्या गावी परत जायचे असल्याने पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. लॉकडाऊनला ४० दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. सुरुवातीपासूनच कंपनीला सुरु ठेवण्याबाबत केंद्र सरकारची परवानगी होती. त्यामुळे कंपनीमार्फत उत्पादन घेतले जात आहे.
कंपनीने कामगारांच्या पुर्ततेसाठी ठेकेदार नेमलेले आहेत. त्यांच्या राहण्यासाठी वडखळ परिसरामध्ये वसाहत निर्माण केलेली आहे. येथील कामगार सध्या कंपनीमध्ये कामाला जात नसल्याचे कळते. कंपनीने त्यांना कामावर येण्यासाठी बोनस आणि पगारात वाढ करण्याचे सांगितल्याचेही बोलले जाते. मात्र कामगारांना आपल्या गावी परत जायचे आहे. याबाबत ते संबंधीतांकडे सातत्याने मागणी करत आहेत. पंरतू नियमांच्या बाहेर जाऊन कोणत्याच यंत्रणेला निर्णय घेता येत नाही. सोमवारी मात्र कामगांरांच्या सयंमाचा बांध तुटला. त्यांनी हजारोच्या संख्येने उठाव केला. आम्हाला आमच्या घरी परत पाठवा अशी मागणी केली. मोठ्या संख्येने कामगार कॉलनीच्या बाहेर पडल्याने कंपनीच्या सुरक्षा विभागाची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी कामगारांना शांत राहाण्याचे आवाहन केले. परंतू कामगार ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते.
वडखळ येथे कामगारांची निदर्शने
वडखळ येथील कामगार वसाहतीमधील कामगारांना त्यांच्या मुळ गावी परत जायचे आहे. यासाठी ते एकत्र आले होते. त्यांना शांत राहाण्याचे आवाहन केले आहे. ज्यांना परत जायचे आहे. त्यांच्या याद्या जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्याचे आश्वासन देण्यात आल्या आहेत. कंपनीने कामगारांना बोनससह पगार वाढवण्याचा प्रस्तावही दिला आहे, असे रायगडचे पोलिस अधिक्षक अनिल पारसकर पारसकर यांनी स्पष्ट केले.दरम्यान, जेएसडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी नारायण बोलबुंडा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.