Coronavirus : रायगड जिल्ह्यातील एक हजार शाळांना सुट्टी, ग्रामीण भाग सध्या सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 02:01 AM2020-03-16T02:01:49+5:302020-03-16T02:03:08+5:30
कोरोनाच्या भीतीने जगभरात चांगलीच खळबळ माजली आहे. आतापर्यंत राज्यामध्ये ३१ रुग्ण आढळले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकाने शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
- आविष्कार देसाई
अलिबाग : कोरोनाच्या भीतीने जगभरात चांगलीच खळबळ माजली आहे. आतापर्यंत राज्यामध्ये ३१ रुग्ण आढळले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकाने शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील तब्बल एक हजार १०० शाळा बंद राहणार आहेत. त्यामुळे शाळांची घंटा पुढील १५ दिवस वाजणार नसल्याने साडेपाच लाख विद्यार्थी सुट्टीवर जाणार आहेत.
महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायती क्षेत्रातील खासगी व्यस्थापनाच्या सर्व अनुदानित, अंशत: अनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थ साहाय्यित माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचा समावेश आहे. सरकारने केवळ शहरी भागातील शाळांबाबत हा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागांमध्ये सध्या कोरोनाची दहशत पोहोचली नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक सुरक्षित असल्याचे त्यानिमित्ताने अधोरेखित होेते.
कोरोनाच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीची ठिकाणे असलेल्या जत्रा, मॉल्स, स्विमिंग पूल, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, व्यायामशाळांवर बंदी घातली आहे. त्यापाठोपाठ सरकारने शाळा-महाविद्यालयांच्या बाबतीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे सूतोवाचही सरकारने केले आहे. पुढील २० दिवस अतिशय महत्त्वाचे असल्याने सरकारकडून कडक उपाययोजना करण्यात येत आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये एक हजार १०० शाळा आहेत. सुमारे साडेपाच लाख विद्यार्थीसंख्या आहे. अशा ठिकाणी कोरोनाचा प्रसार होण्याची जास्त शक्यता आहे. याच कारणाने सरकारने शाळा, महाविद्यालये ३१ मार्च २०२० पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बंदी आदेश हा शहरी आणि निमशहरी भागांसाठी लागू करण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या तब्बल दोन हजार ७०० शाळा सुरूच राहणार आहेत. या ठिकाणी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या सुमारे एक लाखाच्या आसपास आहे. शहरी भागामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी अधिक खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. कोचिंग क्लासेसही बंद ठेवण्याचे निर्देश सरकारने दिलेले आहेत.
कडक कारवाई
साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १९९७ नुसार सरकारने बंदी आदेश लागू केले आहेत. त्यामुळे सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे.