अलिबाग : शहरातील तीन नागरिक दुबई येथे काही कामानिमित्त गेले होते. अलिबागमध्ये दाखल होताच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने त्यांना निगरानी कक्षात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यामध्ये कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. मात्र खबरदारी म्हणून प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
अलिबाग शहरातील नागरिक दुबई येथे कामानिमित्त गेले होते. 14 मार्च 2020 रोजी ते परत आले होते. याबाबतची माहिती प्रशासनाला मिळताच त्यांनी तातडीने संबंधिताना अलिबाग येथे नव्याने स्थापान करण्यात आलेल्या सारंग विश्रामगृहातील निगरानी कक्षात डॉक्टरांच्या निगरानी खाली ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांच्यामध्ये कोणतीच गंभीर लक्षणे दिसत नाहीत. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना दाखल करुन घेण्यात आले आहे. नागरिकांनी याबाबत भयभित न होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, अलिबाग येथील सारंग येथील निगरानी कक्षात तीन नागरिकांना निगरानी खाली ठेवण्यात आल्याच्या वृत्ताला निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी दुजोरा दिला आहे. अलिबागमधील निगरानी कक्षात दाखल करण्यात आलेल्या नागरिकांना कोणतीच गंभीर लक्षणे दिसत नाहीत. निगरानी कक्ष आणि विलीगीकरण कक्ष यामध्ये खूप फरक आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसतात. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते, असे जिल्हाशल्य चिकीत्सक डॉ. प्रमोद गवई यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
निगरानी कक्षामध्ये ठेवलेल्या नागिरकांना खबरदारी म्हणून पुढील काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.