उरण : लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन करून आणि संचारबंदीचे सर्वच आदेश धाब्यावर बसवून कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईहून कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता घारापुरी बेटावर मंगळवार २१ एप्रिल रोजी दाखल झालेल्या तीन लॉन्चेसवर एकूण १२ खलाशी आहेत. या लॉन्चेस मेसर्स महेश टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीच्या आहेत. भाजप पदाधिकारी असलेल्या मालकाच्या या तिन्ही लॉन्चेस असून त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मुंबई मेरिटाइम व विभागाचे बंदर निरीक्षक संजय पिंपळे यांनी दिली.लॉकडाउनदरम्यान गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून पर्यटकांना घेऊन येणाऱ्या शेकडो लॉन्चेस भाऊचा धक्का, दारुखाना येथील बंदरात मागील महिन्याभरापासून नांगरून ठेवण्यात आल्या होत्या. निलकमल, राम अयोध्या, अष्टविनायक अशा तीन लॉन्चेस कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईहून घारापुरी बेटावर दाखल झाल्या आहेत. कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईहून मंगळवारी अचानक दाखल झालेल्या या तीन लॉन्चेसमुळे बेटवासीयांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. जिल्हाबंदी आदेश मोडून आणि संचारबंदीचे सर्वच आदेश धाब्यावर बसवून बेटावर दाखल झालेल्या लॉन्चेसवरील खलाशांची तत्काळ आरोग्य तपासणी करण्यात यावी आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच बळीराम ठाकूर यांनी संबंधित शासकीय विभागाकडे याआधीच केली आहे. ग्रामपंचायतीच्या तक्रारीची दखल घेऊन मेसर्स महेश टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकावर कारवाई करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मुंबई मेरिटाइम व विभागाचे बंदर निरीक्षक संजय पिंपळे यांनी दिली.
घारापुरी बेटावर आलेल्या लॉन्चेसच्या मालकांवर होणार कारवाई?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 1:20 AM