coronavirus: माथेरानमध्ये झाला पर्यटनाचा पुनश्च हरिओम, स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 12:37 AM2020-09-04T00:37:18+5:302020-09-04T00:37:51+5:30

कोरोनाचा प्रसार थांबावा यासाठी केंद्र सरकारने २२ मार्चला देशातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तेंव्हापासून माथेरानचा पर्यटन व्यवसाय बंद आहे. त्यामुळे स्थानिकांची आर्थिक घडी कोलमडली होती.

coronavirus: Tourism start again in Matheran, an atmosphere of happiness among the locals | coronavirus: माथेरानमध्ये झाला पर्यटनाचा पुनश्च हरिओम, स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण

coronavirus: माथेरानमध्ये झाला पर्यटनाचा पुनश्च हरिओम, स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण

googlenewsNext

- मुकुंद रांजणे
माथेरान : पाच महिन्यांपासून बंद असलेले माथेरानचेपर्यटन गुरुवारपासून सुरू झाल्याने येथील स्थानिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

कोरोनाचा प्रसार थांबावा यासाठी केंद्र सरकारने २२ मार्चला देशातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तेंव्हापासून माथेरानचा पर्यटन व्यवसाय बंद आहे. त्यामुळे स्थानिकांची आर्थिक घडी कोलमडली होती. मात्र, गुरुवारपासून सर्व पर्यटनस्थळे सुरू करण्यास परवानगी दिली असल्याने माथेरानमधील पर्यटन हंगाम सुरू होणार आहे.

मात्र पुनश्च हरिओम करण्यासाठी येथील स्थानिकांपुढे अनंत अडचणी उभ्या राहणार आहेत. मे महिन्याचा व पावसाळी पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी अनेकांनी आपल्या दुकानात व हॉटेलमध्ये माल भरून ठेवला होता. मात्र पाच महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये या सर्व मालाची वापर करण्याची मुदतवेळ संपली आहे. त्यामुळे नव्याने सर्वांना सामान आणावे लागणार आहे. आधीचेच कर्ज फेडले नसल्याने नवीन माल कसा आणायचा, असा प्रश्न लहान व्यावसायिकांना सतावत आहे.

सध्या पर्यटन सुरू होण्याने माथेरानकरांना त्याचा काहीही उपयोग नसल्याचे काही जणांचे म्हणणे असले तरी काही ना काही व्यवसाय सुरू होणार असल्याचे समाधान मात्र सर्वांना आहे.

माथेरानचे पर्यटन सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांनी स्वत:चे आरोग्य सांभाळून व्यवसाय करावा. देशाच्या विविध ठिकाणांहून पर्यटक येणार असल्याने शासनाने आखून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करूनच व्यवसायास सुरुवात करावी.
- प्रेरणा प्रसाद सावंत,
नगराध्यक्षा, माथेरान

पाच महिन्यांपासून हातरिक्षा व्यवसाय बंद झाल्याने आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. पावसाने आमच्या रिक्षाही जागेवर राहिल्याने खराब होत आल्या होत्या. मात्र, आता पर्यटक येणार असल्याने सर्व समस्या सुटणार आहेत.
- गणपत रांजाने, हातरिक्षा चालक

संपूर्ण पावसाळा रूम्स बंद असल्याने आता पर्यटन सुरू करण्याअगोदर रंगरंगोटी करणे आवश्यक आहे. आधीच पर्यटन हंगामास मुकल्याने रेंट, वीज, पाणी बिले थकीत आहेत. आता हा खर्च वाढणार आहे.
- संजय कदम, लॉजिंग व्यावसायिक

मे महिन्याचा पर्यटन हंगाम लक्षात ठेवून आम्ही कर्ज काढून सर्व माल भरला होता. मात्र, पर्यटन बंद झाल्याने पावसाचा फटका या सर्व मालाला बसल्याने आगामी काळात नवीन माल भरताना पुन्हा कर्ज काढावे लागणार आहे. - हेमंत पवार, चर्मोद्योग व्यावसायिक

पाच महिने दुकाने बंद राहिल्याने चिक्की, शीतपेय, पॅकेट फूड, बाटलीबंद पाणी, आइसक्रीम हे सर्व खराब झाल्याने फार मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. आता पर्यटन सुरू करताना नव्याने सुरुवात करावी लागणार आहे.
- राजू शाह, चिक्की व्यावसायिक

पाच महिन्यांपासून घोडा व्यवसाय बंद झाल्याने संपूर्ण कुटुंबाला त्याची झळ सोसावी लागली आहे. आता पर्यटन सुरू झाल्याने दिलासा मिळणार आहे.
- राकेश कोकळे, घोडा व्यावसायिक

Web Title: coronavirus: Tourism start again in Matheran, an atmosphere of happiness among the locals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.