माथेरान : जगाला हैराण करणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात काळजी घेतली जात आहे. माथेरान या जगप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी विशेष खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे. तसे लेखी आदेश काढले असून, त्याची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली. येथील दस्तुरीनाका येथे पर्यटकांना माथेरानमध्ये प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.माथेरानमध्ये देश-विदेशातून पर्यटक येत असतात व कोरोनाचा झपाट्याने होत असलेला प्रसार पाहता, येथे सुरक्षिततेचे साधन म्हणून पर्यटकांना येण्यास बंदी असल्याचे परिपत्रक काढण्यात आले. त्याची अंमलबजावणी माथेरान नगरपालिकेने तातडीने सुरू केली असून, येथे पर्यटकांना प्रवेशास बंदी घातली आहे. त्यामुळे बुधवारी दुपारपासून अनेक पर्यटकांना येथील दस्तुरीनाका येथूनच परत जावे लागले. पर्यटकांना प्रवेशबंदीमुळे माथेरानकरांना मोठ्या आर्थिक तोट्यास सामोरे जावे लागणार असून, याचा फटका येथील मिनीट्रेन शटलसेवेलाही बसला आहे. बुधवारी दुपारपासून माथेरानमध्ये येणाºया गाड्या रिकाम्या धावत होत्या. येथील अनेक हॉटेलच्या आगाऊ बुकिंग रद्द झाल्या असून, ३१ मार्चपर्यंत आगाऊ बुकिंग केलेल्या पर्यटकांना मार्चनंतर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बंदी लागू झाल्याने माथेरान बाजारपेठेत शुकशुकाट पसरला असून, हातावर पोट असणाºया कष्टकºयांना याचा मोठा फटका बसणार आहे.सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्र ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. माथेरानमध्ये रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी जंतुनाशक फवारणी व धुरळणी (फोगिंग) नियमित करण्यात येत आहे. यासाठी अधीक्षक मुख्याधिकारी बी. बी. भोईर, कार्यालय अधीक्षक रंजित कांबळे, डॉक्टर उदय तांबे, आरोग्य पर्यवेक्षक अभिमन्यू येळवंडे, औषध निर्माण अधिकारी सदानंद इंगळे आदींनी सुरक्षेबाबत लक्ष केंद्रित केले आहे, अशी माहिती नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी दिली.हॉटेल्स, खासगी लॉजमध्ये बुकिंग न करण्याची सूचनामाथेरान नगरपालिके च्या हद्दीमध्ये कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी परदेशी नागरिकांचे हॉटेल्स, खासगी लॉजमध्ये पुढील तीन ते चार आठवडे रुम्स बुकिंग करण्यात येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. रविवारचा आठवडी बाजार बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना सोडून इतर गर्दी होणाºया आस्थापना तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.वैद्यकीय अधिकाºयांना सतर्क राहण्याच्या सूचनाकोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंध उपाययोजना करण्यासाठी नगरपालिके च्या वैद्यकीय अधिकाºयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी आवश्यक औषधसाठा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. कोरोना विषाणू संसर्गबाधित देशातून आलेल्या परदेशी नागरिक, भारतीय नागरिक आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी व निगराणी ठेवण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक, माथेरान पोलीस ठाणे यांना कळविण्यात आले आहे.
Coronavirus : माथेरानमध्ये ३१ मार्चपर्यंत पर्यटकांना बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 3:09 AM