Coronavirus: रोहा तालुक्यात तीनऐवजी दोन दिवसीय बंद; प्रांताधिकाऱ्यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 02:04 AM2020-05-06T02:04:16+5:302020-05-06T02:04:23+5:30
रोहा नगराध्यक्षांनी घेतली बैठक; अफवा न पसरवण्याचे आवाहन
रोहा : देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाउनच्या तिसºया पर्वास सोमवारपासून प्रारंभ होत आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी रोह्यातील सर्व पक्षप्रमुख, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, व्यापारी प्रतिनिधी आदींची बैठक ज्येष्ठ नागरिक सभागृह रोहे येथे रविवारी सायंकाळी बोलावण्यात आली होती. बैठकीत यापुढे तीनऐवजी दोन दिवसीय बंद घेण्याच्या निर्णयासह प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने यांनी उपस्थितांशी संवाद साधत शंकांचे निरसनही केले. त्याचबरोबर दुकाने सुरू होण्याबाबत सोशल मीडियावरील चुकीची माहिती देणाºया संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
लॉकडाऊनच्या तिसºया पर्वातही शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचीनुसार योग्य ती अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यात येईल, असे प्रांताधिकारी माने यांनी या वेळी सांगितले.
ज्या अत्यावश्यक सेवा आजपर्यंत सुरू आहेत त्या लॉकडाऊनच्या पुढील कालावधीतही सुरू राहणारच असून त्याव्यतिरिक्त मान्सूनपूर्व कामे करण्यासाठीची परवानगी देण्यात येणार आहे, हार्डवेअरची दुकाने सुरू राहणार आहेत, शासनाच्या आदेशानुसार दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. त्यासंबंधीच्या अटी व शर्ती यांची पूर्तता करणे बंधनकारक राहणार आहे. त्याव्यतिरिक्त कपडे, सराफा दुकाने, पान टपºया, केशकर्तनालये, पार्लर आदी आस्थापने सुरू करण्याबाबत अजून शासनाकडून कोणतीही मार्गदर्शक सूची अथवा सूचना अद्याप आलेल्या नसून त्या सूचना आल्या की अपल्याला कळवण्यात येईल, असे प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने यांनी उपस्थितांना सांगितले.
रोह्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी बहुतांशी व्यापारी नियम पाळत असून एखाद्दुसरा कोणी जर नियमभंग करत असेल तर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी या मागणीसह अत्यावश्यक सेवेतील पास ज्यांना देण्यात आले आहेत त्यांनी प्रशासनाला सहकार्य करायला स्वत:हून पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त झाली. बैठकीसाठी रोह्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, उपनगराध्यक्ष समीर सकपाळ, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, लोकप्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी, विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नागरिकांनी स्वत:चे दायित्व न विसरता कर्तव्याचे पालन करावे. सोशल मीडियावर चुकीची माहिती देणाºया संदेशांवर विश्वास ठेवू नये.
- डॉ. यशवंतराव माने, प्रांताधिकारी
कोणालाही त्रास व्हावा हा प्रशासनाचा हेतू नाही. कायद्याचे व प्रचलित नियमांचे पालन व्हावे. - नामदेव बंडगर, पोलीस निरीक्षक
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी बाहेरून येणाऱ्यांची आरोग्य तपासणी होणार
रायगड जिल्ह्यातील अनेक लोक आज बाहेरगावी अडकलेले आहेत. त्यामध्ये आपल्या तालुक्यातील लोकांचाही समावेश असून त्यांना तालुक्यात परत आणण्यासाठीची प्रक्रिया सुरू असून ते तालुक्यात आल्यावर त्यांची सर्वप्रथम शासकीय रुग्णालयात तपासणी करून, त्यांच्यात आजाराची काही लक्षणे दिसतात का, याची पडताळणी करण्यात येईल व लक्षणे आढळून न आल्यास त्यांना होम क्वारंटाइन करण्यात येईल. मात्र लक्षणे आढळल्यास त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येईल, असे प्रांताधिकारी डॉ. माने यांनी या वेळी सांगितले. बाहेरून येणाºया लोकांमुळे गावात संक्रमण होणार नाही यासाठी प्रशासन शक्य ती सर्व खबरदारी घेईल, असे उपस्थितांना आश्वस्त केले.