coronavirus: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने उरण-करंजा खाडीपूल केला बंद, ग्रामस्थांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 12:50 AM2020-05-12T00:50:16+5:302020-05-12T00:51:08+5:30
उरण तालुक्याच्या पूर्व विभागातून पेण तालुक्यात जाण्यासाठी वशेणी येथून सुरू असलेल्या वशेणी - दादर खाडीपूल रस्ता आहे. पेण-हमरापूरमार्गे कोकण गोव्याकडे जाण्यासाठी वशेणी-दादर खाडीपूल हा शॉर्टकट ठरत असल्याने या खाडीपुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
उरण : करंजा-उरणमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाच्या भीतीने वशेणी - दादर खाडीपुलावर ग्रामस्थांनी गणेशमूर्ती, फांद्या टाकून वाहतुकीसाठी बंद केल्याचा प्रकार घडला आहे.
उरण तालुक्याच्या पूर्व विभागातून पेण तालुक्यात जाण्यासाठी वशेणी येथून सुरू असलेल्या वशेणी - दादर खाडीपूल रस्ता आहे. पेण-हमरापूरमार्गे कोकण गोव्याकडे जाण्यासाठी वशेणी-दादर खाडीपूल हा शॉर्टकट ठरत असल्याने या खाडीपुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. लॉकडाउन, संचारबंदी काळात मात्र खाडीपुलावरील वाहतूक मंदावली होती. मात्र शासनाच्या निर्णयानुसार, अत्यावश्यक सेवेबरोबरच एसटीची सेवाही हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान करंजा परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील वाहने पेण तालुक्यात व पेण तालुक्यातील वाहने उरण तालुक्यातील गावांकडे ये-जा करून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वशेणी - दादर मार्गावरील खाडीपुलावर दोन्ही बाजूंकडील रस्ता ग्रामस्थांनी बंद केला आहे.
खाडीपूल बंद करण्यासाठी वशेणी - दादर खाडीपुलावर ग्रामस्थांनी गणेशमूर्ती, फांद्या, झाडेझुडपे, दगड, नारळाच्या झावळ्या आणि रस्सीचा वापर केला आहे. त्यामुळे यामार्गे भाजीपाला खरेदी करण्यासाठी पेणमध्ये जाणाऱ्यांना खारपाडामार्गे आणखी ५ ते ६ किमीचा वळसा घ्यावा लागत आहे. उरण तालुक्यातील फळ व भाजी विक्रेते फळ व भाजी विक्रीसाठी पेण येथील बाजार समितीमध्ये जात असल्याने तेथील व्यावसायिकांत नाराजी आहे.
उरण सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता सी.आर. बांगर व पेण सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता डी.एम. पाटील यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, ही बाब आपत्कालीन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा रायगड जिल्हाधिकारी यांच्या अधिकार कक्षेत असल्याचे सांगत त्यांनी जबाबदारी झटकली.