coronavirus: मिरची खरेदीसाठी स्कूलबसचा वापर, कर्जत पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 03:32 AM2020-05-10T03:32:21+5:302020-05-10T03:33:09+5:30
ल ग्राहक मिरची खरेदीसाठी कर्जत शहरात सर्रास येत असल्याने कर्जत शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी पनवेलमधून एक स्कूलबस मिरची खरेदीसाठी आली आणि कर्जतकर आक्रमक झाले.
- विजय मांडे
कर्जत : पनवेल, नवी मुंबई रेड झोन आहे. दिवसेंदिवस येथील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या भागातील ग्राहक मिरची खरेदीसाठी कर्जत शहरात सर्रास येत असल्याने कर्जत शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी पनवेलमधून एक स्कूलबस मिरची खरेदीसाठी आली आणि कर्जतकर आक्रमक झाले. त्यांनी स्कूलबसवर पाळत ठेवून पोलिसांशी संपर्क साधला. अखेर स्कूलबस पोलीस ठाण्यात नेण्यात आली. दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवून संध्याकाळी समज देऊन सोडण्यात आले. बाहेरील नागरिक, वाहनचालकांना कर्जतमध्ये बंदी करावी, अशी मागणी कर्जतकरांकडून होत आहे.
कर्जतमध्ये चांगली मिरची मिळते म्हणून रायगड, ठाणे जिल्ह्यातील ग्राहक नेहमीच खरेदीसाठी कर्जतला येतात. सध्या पनवेल आणि नवी मुंबई रेड झोनमध्ये आहे. तरीही पहाटे ६ वाजल्यापासूनच पनवेल परिसरातील ग्राहक मिरची खरेदीसाठी सर्रास वाहने घेऊन येत आहेत. याबद्दल पोलिसांना दोष दिला जातो; परंतु पोलिसांचा डोळा चुकवून किंवा अत्यावश्यक सेवा असा फलक असलेले वाहन घेऊन ग्राहक येतात. त्यामुळे पोलिसांचा नाइलाज होतो. काही ग्राहक भिसेगाव मार्गे जुन्या एसटी स्टॅण्डपर्यंत वाहने आणून तेथे ठेवतात आणि रेल्वे ब्रिजवरून कर्जत बाजारपेठेत मिरची खरेदी करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाहेरील व्यक्तींना कर्जत शहरात प्रवेश दिला जाऊ नये, अशी मागणी कर्जतकरांकडून होत आहे.
शनिवारी एम एच ४६ एक्स २५३८ क्रमांकाची, नवीन पनवेल असे लिहिलेली स्कूलबस महावीरपेठेत आली. हे कर्जतकरांच्या निदर्शनास आले आणि ते आक्रमक झाले. पोलिसांशी संपर्क साधल्यावर शोधाशोध सुरू झाली. अर्ध्या तासानंतर स्कूलबसचा चालक आणि मिरची खरेदीदार तेथे आले. तेथे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, सुनील गोगटे, राहुल कुलकर्णी, समीर सोहनी आदीच्या तक्रारीनंतर स्कूलबस पोलीस ठाण्यात नेण्यात आली. पोलीस निरीक्षक अरुण भोर यांनी मिरची खरेदीदार आणि स्कूलबसचालकाला दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून चांगलीच समज दिली आणि संध्याकाळी सोडून दिले.
पनवेलहून येणारी वाहने भिसेगाव मार्गे जुन्या एसटी स्टॅण्डकडे येतात, त्यामुळे भिसेगावचा मार्ग बंद केला असून सर्व वाहने चारफाटा मार्गे जातील, अशी व्यवस्था केली आहे.
- अरुण भोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कर्जत