coronavirus: महाड तालुक्यातून कोरोनाची माघार, पंधरा दिवसांपासून रुग्ण कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 12:46 AM2020-10-27T00:46:01+5:302020-10-27T00:46:29+5:30
Corona News : मार्च महिन्यापासून संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन सुरू झाले. त्यावेळी महाड तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. एप्रिल, मे आणि जून या महिन्यात परिस्थिती सामान्य होती. मात्र, जुलैनंतर महाड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढत गेले.
दासगाव : गेली काही दिवस दहशत माजवणाऱ्या कोरोनाने अखेर महाड तालुक्यातून माघार घेतल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला चाळीस, पन्नास, नव्वद असे रुग्ण आढळत असताना, गेल्या पंधरा दिवसापासून चार, पाच, दोन आणि शून्य असा आकडा कमी होत गेला आहे.
मार्च महिन्यापासून संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन सुरू झाले. त्यावेळी महाड तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. एप्रिल, मे आणि जून या महिन्यात परिस्थिती सामान्य होती. मात्र, जुलैनंतर महाड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढत गेले. संपूर्ण तालुक्यात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरुवातीला शासनाच्या वतीने रुग्णांवर महाड ट्रमा केअर सेंटरमध्ये कोविड सेंटर तयार करण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टर भास्कर जगताप यांनी रुग्णांवर उपचार केले. महाडमध्येच उपचार होत असल्याने नागरिकांमधली मोठ्या प्रमाणात असलेली कोरोनाची भीतीही दूर झाली होती.
ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये महाड तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत गेली. होणाऱ्या वाढत्या संख्येला पाहता, महाड औद्योगिक क्षेत्रात के.एस.एफ. कॉलनीत १८० बेडचे कोविड सेंटर तयार करण्यात आले व त्या ठिकाणीही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी एक दिलासा मिळाला. मात्र, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येत महाड तालुक्यात सापडत होते. ती संख्या आता गेली आठ दिवसांपासून कमी झाली असून, शून्यावर आली आहे. सध्यातरी या आकड्यामुळे महाड तालुक्यात भीतीचे वातावरण दूर झाले आहे.
कर्जतमध्ये एकही रुग्ण नाही: आता कर्जत तालुका कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. सोमवारी तालुक्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. त्यामुळे दिलासादायक चित्र पाहायला मिळाले आहे. आजपर्यंत १,७४८ रुग्ण सापडले असून, त्यापैकी १,६४२ रुग्ण कोरोना वर मात करून घरी आले आहेत. आता ११ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.
संख्या आली शून्यावर : आतापर्यंत महाड तालुक्यात गेल्या सात महिन्यांत १,७५८ रुग्ण आढळून आले. त्यामध्ये १,६६६ बरे झाले, तर १८ उपचार घेत असून, ७४ रुग्णांचा मृत्यू झाला. गेली आठ दिवसांपासून ही संख्या कमी झाली असून, शून्यावर आली आहे.
उरणमधील ४५ रुग्णांना डिस्चार्ज
उरण : उरण परिसरात २६ ऑक्टोबर रोजी नव्याने कोरोनाच्या ४ रुग्णांची नोंद झाली आहे, तर ४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उरण तालुक्यातील आजतागायत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता २०५० पर्यंत पोहोचली आहे. यापैकी आजतागायत १,८९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर सध्या ५६ पॉझिटिव्ह रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.