- संजय गायकवाड
कर्जत : नगरपरिषदेची निवडणूक २७ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे. छाननीनंतर नगराध्यक्षासह ५५ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत. १७ जानेवारी रोजी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतरच नगरपरिषदेच्या निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.
कर्जत नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाली. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदासह ११४ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली होती. त्या वेळी अगदी अंतिम क्षणी शिवसेना-भारतीय जनता पक्ष-आरपीआय अशी महायुतीची घोषणा झाली.
शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केली आणि नगरसेवक पदासाठी महायुतीच्या १९ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्र दाखल केली. ज्यांना उमेदवारी नाकारली त्यांनी थोडासा थयथयाट करून नाराजी व्यक्त केली. कुणी बंडखोरी करणे पसंद केले तर कुणी आपली नाराजी आतून व्यक्त करण्याचा इरादा ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-महाराष्ट्र नवनिर्माण सेना-स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष- शिवराय भीमराय क्रांती अशा महाआघाडीच्या २ उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी आणि १८ प्रभागांमध्ये पर्यायी उमेदवारांसह २० नामनिर्देशन पत्र दाखल केली. काहींनी अपक्ष म्हणूनही नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. बहुजन रिपब्लिकन सोसियालिस्ट पार्टीच्या एका उमेदवाराने नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते.
छाननीच्या दिवशी ११४ पैकी ५९ नामनिर्देशन पत्र अवैध ठरली, तर ५५ नाममनिर्देशन पत्र वैध ठरली. नगराध्यक्षपदाच्या पाच उमेदवारांच्या सहा नामनिर्देशन पत्रांपैकी चार नामनिर्देशन पत्र अवैध ठरली व नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवार रिंगणात समोरा-समोर निवडणूक लढविणार असल्याचे चित्र छाननीच्या दिवशीच स्पष्ट झाले. राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी आणि शिवसेना महायुतीमध्ये निवडणूक रंगणार आहे. महायुतीच्या उमेदवारांची घोषणाही झाली असून, त्यांनी प्रचारालासुद्धा सुरु वात केली आहे. ज्यांना उमेदवारी नाकारली आहे, त्यापैकी काहींनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन प्रचाराला सुरु वात केली आहे. त्याप्रमाणेच योगायोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन रॅलीच्या सभेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी उमेदवारांची यादी सादर केली असली, तरी महाआघाडीत समविचारी पक्षाचे काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष सहभागी होतात काय? याची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे १७ जानेवारीला उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम दिवशी खरे चित्र स्पष्ट होईल.च्निवडणूक रिंगणात सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा नगराध्यक्षपदासाठी एक, नगरसेवकपदासाठी १८, शिवसेनेचा नगराध्यक्षपदासाठी एक आणि नगरसेवकपदासाठी १५, भाजपाचे चार, शेतकरी कामगार पक्षाचे दोन, काँग्रेसचे सहा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन, भारिपचा एक आणि अपक्ष पाच असे ५५ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, खरे चित्र १७ जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी स्पष्ट होईल.