जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाला आला कॉर्पाेरेट लूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 01:58 AM2019-11-14T01:58:15+5:302019-11-14T01:58:22+5:30
दोन टेबलांच्या मधून एकच व्यक्ती जाईल, अशी गर्दीची जागा, फायलींचा साठलेला ढीग, डोक्यावर खडखड वाजणारा पंखा, असे सरकारी कार्यालयाचे चित्र आपण नेहमीच बघत आलो आहोत;
आविष्कार देसाई
अलिबाग : नेहमीच अंधारलेल्या खोल्या, दोन टेबलांच्या मधून एकच व्यक्ती जाईल, अशी गर्दीची जागा, फायलींचा साठलेला ढीग, डोक्यावर खडखड वाजणारा पंखा, असे सरकारी कार्यालयाचे चित्र आपण नेहमीच बघत आलो आहोत; परंतु रायगड जिल्हा परिषद अशा गोष्टींना अपवाद ठरत असल्याचे दिसते. तब्बल ७० लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाचे मेकओव्हर होत आहे. नव्याने मिळणाऱ्या कॉर्पाेरेट लूकमुळे आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्याला बळ मिळणार असल्याचे बोलले जाते.
रायगड जिल्हा परिषदेच्या इमारतीला तब्बल ३० वर्षे उलटून गेली आहेत. आजही शिवतीर्थ नावाची ही देखणी वास्तू राज्याचे लक्ष वेधत आहे. शेकापचे तत्कालीन अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी या वास्तूची उभारणी केली आहे. शिवरायांनी रयतेचे राज्य याच रायगडातून चालवले होते. त्यानुसारच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील राज्यकारभार चालावा. या हेतूने प्रेरीत होऊनच प्रभाकर पाटील यांनी या इमारतीला शिवतीर्थ असे नाव दिले आहे. शिवतीर्थ इमारतीमध्ये महिला व बालकल्याण, समाजकल्याण, अर्थ विभाग, ग्रामपंचायत, ग्रामीण पाणीपुरवठा, सामान्य प्रशासन, आरोग्य विभाग, पाणी व स्वच्छता यासह अन्य विभाग आहेत. त्याचप्रमाणे तीन सभागृह, विविध खात्याचे प्रमुख, सभापती यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालये आहेत. नव्याने निवडून येणारे सदस्य आणि अधिकारी आपापल्या आवडीनुसार दालनाची सजावट करत आले आहेत; परंतु कर्मचाºयांना आता चांगल्या जागेत बसून काम करता येणार आहे.
अर्थ विभागातील कार्यालयाची रचना कालबाह्य झाली होती. त्यामुळे अर्थ विभागाचे प्रमुख दत्तात्रेय पाथरुट यांनी मेकओव्हर करण्याचा निर्णय घेतला. सत्ताधारी पक्षाचे प्रभारी उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी त्यांना तातडीने मान्यता दिली. त्यानुसार आता अर्थ विभागातील कार्यालयाची रचना बदलण्यात आली आहे. बसण्यासाठी अतिशय सुटसुटीत जागा, चांगल्या दर्जाची बैठक व्यवस्था टेबल, खुर्ची, लख्ख प्रकाश, वातानुकूलित यंत्रणा, प्रत्येकाला स्वतंत्र शेल्फ, ड्रॉव्हर अशी व्यवस्था करण्यात येत आहे. अर्थ विभागामध्ये एकत्रित मिळून ४० कर्मचारी आहेत. त्याचप्रमाणे कॅशिअर, अकाउंट आॅफिसर, मुख्य लेखाधिकारी, सहायक लेखाधिकारी यांचे स्वंतत्र दालन उभारण्यात आले आहे.
>उत्कृष्ट पद्धतीने सर्व अंतर्गत रचना निर्माण करण्यात आल्याने अर्थ विभागाच्या कार्यालयाला आता कॉर्पाेरेट कंपन्यांच्या कार्यालयासरखा लूक आला आहे. त्यामुळे आता काम करताना थकवा जाणवणार नाही, तसेच वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होऊन कर्मचाºयांची कार्यक्षमता वाढेल, असा विश्वास अर्थ विभागाचे प्रमुख दत्तात्रेय पाथरुट यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
>सुमारे ७० लाख रुपये यावर खर्च करण्यात आले आहेत. लवकरच या नवीन कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष आस्वाद पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचेही पाथरुट यांनी सांगितले. अंतर्गत रचना बदलण्यासाठी वापरण्यात आलेले सर्व साहित्य चांगल्या दर्जाचे आहे. त्यामुळे वाळवी, आग यापासून पुढील १५ ते २० वर्षे संरक्षण होणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. लवकरच अन्य विभागातील कार्यालयांचा मेकओव्हर करण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.