नगरसेवकांना महासभेची प्रतीक्षा; पाच महिने रखडलेल्या प्रकल्पावर चर्चेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 02:01 AM2020-08-24T02:01:50+5:302020-08-24T02:02:28+5:30
नगरसेवकांच्या आग्रहास्तव ३१ ऑगस्टला पनवेल महानगरपालिकेची महासभा पार पडणार आहे.
वैभव गायकर
पनवेल : मागील पाच महिन्यांपासून कोरोनाचा लढा पालिका प्रशासन लढत आहे. लॉकडाऊनच्या काळात महानगरपालिकेची एकही महासभा होऊ शकली नसल्याने, सध्याच्या घडीला नगरसेवकांना महासभेची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
विशेष म्हणजे, कोविड व्यतिरिक्त रखडलेले प्रकल्प, नागरिक समस्या आदींवर चर्चेची मागणी नगरसेवकांकडून केली जात आहे. पनवेल महानगरपालिकेतील २० प्रभागांत एकूण ८३ नगरसेवक आहेत, यापैकी ५६ नगरसेवक भाजपचे तर २७ नगरसेवक शेकापचे आहेत. मात्र, निवडक नगरसेवक सोडले, तर इतर नगरसेवक कोविड काळात गायबच होते, असे दिसून आले. पनवेलमध्ये सभागृहनेते परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेवक राजू सोनी, नगरसेवक अजय बहिरा, तर खारघरमधून स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक हरेश केणी, नगरसेविका लीना गरड, नगरसेविका नेत्रा पाटील, नगरसेवक नीलेश बाविस्कर, प्रभाग अ सभापती शत्रुघ्न काकडे, नगरसेवक गुरुनाथ गायकर, तर कळंबोली कामोठेमधून नगरसेवक रवींद्र भगत, नगरसेवक सतीश पाटील, नगरसेविका हेमलता गोवारी, नगरसेवक डॉ.अरुण भगत हे नगरसेवक या काळात कार्यरत होते.
अनेक नगरसेवक घरात बसून कोविड रुग्णांच्या उपचारासंदर्भात पालिका प्रशासन, तसेच कोविड रुग्णालय प्रशासनाच्या संपर्कात होते. मात्र, कोरोनासोबत जगणे सर्वांना भाग असल्याने, नगरसेवकांनी आयुक्तांकडे महासभेत मागणी केली आहे. अनलॉक सुरू झाल्याने नगरसेवक पुन्हा एकदा कामाला लागल्याचे दिसून येत आहे.
नगरसेवकांच्या आग्रहास्तव ३१ ऑगस्टला पनवेल महानगरपालिकेची महासभा पार पडणार आहे. कोविड काळातील पालिका प्रशासनाचे कामकाज आदींसह कोविड व्यतिरिक्त इतर प्रश्नांवर चर्चा होणार आहे. मागील पाच महिन्यांपासून नगरसेवक व पालिका प्रशासनासोबत थेट चर्चा झाली नसल्याने, या महासभेत पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
काही नगरसेवकांनी गाठले होते फार्महाउस
कोविड काळात लॉकडाऊन घोषित होताच, काही नगरसेवकांनी थेट आपले फार्महाउस गाठत तेथेच थांबण्याचा निर्णय घेतला होता. नगरसेवकाव्यतिरिक्त राजकीय पदाधिकारी व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, यावेळी नागरिकांना सहकार्य करताना दिसून आले.