भालगाव घरकूल योजनेत भ्रष्टाचार
By admin | Published: July 12, 2015 10:31 PM2015-07-12T22:31:44+5:302015-07-12T22:31:44+5:30
तालुक्यातील भालगाव ग्रामपंचायत हद्दीतील मंजूर घरकूल योजनेत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी तेथील ग्रामसेवकांची बदली करण्यात आली
रोहा : तालुक्यातील भालगाव ग्रामपंचायत हद्दीतील मंजूर घरकूल योजनेत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी तेथील ग्रामसेवकांची बदली करण्यात आली असून विस्तार अधिकारी यांच्यामार्फत या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती गटविकास अधिकारी आर.एन. भामोदे यांनी दिली.
भालगाव ग्रामपंचायतीतील मंजूर घरकुलांचे पैसे लाभार्थ्यांना अदा करताना एस. एल. पाटील यांनी लाभार्थ्यांच्या अशिक्षितपणाचा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेत गैरव्यवहार केल्याची तक्रार शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य विनायक धामणे यांनी गटविकास अधिकारी रोहा तसेच प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे केली आहे. मागील दोन वर्षांच्या कालावधीत मंजूर झालेल्या घरकुलांची कामे अपूर्ण असताना देखील ग्रामसेवक यांनी पैसे अदा केले आहेत. यातील काही लाभार्थी मयत असताना देखील त्यांच्या नावाचे पैसे काढण्यात आले आहेत. तसेच जुन्या घरांना रंगरंगोटी करूनही त्यांचे पैसे अदा केले आहेत. धामणे यांनी पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांना जागेवर नेऊन प्रत्यक्ष प्रकार निदर्शनास आणला होता. प्रत्येक घरकुलामागे २० ते ५० हजार रूपयांचा अपहार झाल्याचा धामणे यांचा आरोप आहे.