धुतुम ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार? सेना- भाजपचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 01:16 AM2021-03-22T01:16:00+5:302021-03-22T01:16:17+5:30
ग्रामपंचायतीच्या कामाचे लेखापरीक्षण करावे
उरण : वार्षिक ९० लाखांचे उत्पन्न असलेल्या धुतुम ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी शेकापने अडीच कोटींच्या केलेल्या अनेक विकासकामात अपहार केला आहे. शासनाच्या निधीचा दुरुपयोग झाल्याचा आरोप करीत सेना-काँग्रेसच्या चार सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कामाचे लेखापरीक्षण करण्याची मागणी रायगड जिल्ह्याचे सहाय्यक संचालकांकडे केली आहे.
शासनाच्या निधीचा दुरुपयोग झाल्याचा गंभीर आरोप रविनाथ ठाकूर,अंगत ठाकूर, निर्मला ठाकूर, पूजा ठाकूर आदी सेना-काँग्रेसच्या चार सदस्यांनी केला. पुराव्यानिशी दाखल केलेल्या लेखी तक्रारीची माहिती देतानाच तातडीने धुतुम ग्रामपंचायतीच्या कामाचे लेखापरीक्षण करण्याची मागणी रायगड जिल्ह्याचे सहाय्यक संचालकांकडे केली आहे. या मागणीमुळे मात्र तालुक्यात खळबळ उडाली आहे.
उरण तालुक्यातील धुतुम ग्रामपंचायतीमध्ये सदस्य संख्या ९ आहे. यापैकी थेट निवडून आलेल्या सरपंचासह शेकापचे ६ सदस्य तर दोन-दोन सदस्य सेना-काँग्रेसच्या महाआघाडीचे आहेत. शेकाप मागील साडेतीन वर्षांपासून सत्तेवर आहे. याआधीही विविध राजकीय पक्षांच्या सत्ताकाळातही धुतुम ग्रामपंचायत कायम वादात राहिली आहे. मात्र मागील साडेतीन वर्षांपासून ग्रामपंचायतींमध्ये सुरू असलेल्या गैरकारभाराच्या तक्रारीनंतर पुन्हा एकदा ग्रामपंचायत चर्चेत आली आहे.
वार्षिक ९० लाखांचे उत्पन्न असलेल्या धुतुम ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी शेकापने अडीच कोटींच्या विकासकामात अपहार केला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून गैरकारभार चालविला आहे. विरोधकांच्या ठाम विरोधानंतरही ५७ लाखांची रक्कम बुडित गेलेल्या कर्नाळा बँकेत ठेवण्यात आली आहे. ३५ लाख रुपये खर्च घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आला आहे. मात्र कचरा व्यवस्थापन कागदावरच उरले आहे. ग्रामपंचायतींमध्ये मागील साडेतीन वर्षांच्या कालावधीत सुमारे अडीच कोटींची विविध विकासकामे, दुरुस्ती आणि इतर तत्सम कामे झाल्याचे दाखविण्यात आली आहेत. मात्र ही कामे फक्त प्रत्यक्षात कागदावरच दिसून येत आहेत. यामध्ये सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी न झालेल्या कामांची बनावट बिले बनवून मोठ्या प्रमाणावर निधीचा अपहार केला आहे. विरोधी सदस्यांनी मागणी केल्यानंतरही प्रोसिडिंग, आवश्यककागदपत्रे, माहिती दिली जात नाही. सत्ताधाऱ्यांनी चालविलेल्या अशा मनमानी कारभारामुळे मात्र ग्रामपंचायतीचा विकास पूर्णपणे खुंटला आहे.
धुतुम ग्रामपंचायतीमध्ये गावाच्या विकासात सत्ताधारी आणि विरोधक असा कोणत्याही प्रकारचा पक्षभेद न करता विकास कामे पार पाडीत आहोत. मात्र स्वतःला विरोधक समजणारे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतीच्या सभेस उपस्थित राहूनही सभेच्या अजेंठ्यावर स्वाक्षऱ्या करीत नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मुभा का देण्यात यावी? भ्रष्टाचार, गैरप्रकार, मनमानी कारभाराचा कोणताही ठोस पुरावा नाही. त्यामुळे विरोधकांकडून करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांना योग्य वेळी चोख उत्तर दिले जाईल. - रेश्मा ठाकूर, सरपंच, धुतुम