नांदगाव/ मरु ड : मुरुड नगरपरिषदे मार्फत २०१६-१७ रोजी मुरुड शहरातील अंतर्गत रस्ते तयार करण्यात आले. यासाठी शासनाकडून दोन कोटी ३४ लाख एवढे अनुदान प्राप्त झाले होते. मात्र, हे कामे निकृष्ट तसेच पावसाच्या कालावधीत करण्यात आले होते. याबाबत त्या वेळी आम्ही विविध मार्गाने अर्ज करून याबाबत दाद मागितली होती; परंतु सत्ताधारी त्या वेळच्या नगरसेवकांनी आमचे म्हणणे न ऐकता, कामे चांगल्या दर्जाची झाली असे दाखून, संबंधित ठेकेदाराला बिले अदा के लीआहेत. या संपूर्ण कामात ९० लाखांचा भ्रष्टाचार झाला असून, या प्रकरणास त्या वेळच्या मुख्याधिकारी वंदना गुळवे व अभियंता प्रशांत पवार जबाबदार असून या दोघांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, तसेच या प्रकरणात गुंतलेल्या लोकांची चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केली आहे.ही पत्रकार परिषद जिल्हापरिषद गेस्ट हाऊस येथे संपन्न झाली. या वेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष व नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर, नगरसेवक मनोज भगत, विश्वास चव्हाण, आशिष दिवेकर, प्रांजली मकू, आरती गुरव आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. मंगेश दांडेकर म्हणाले की, नवीन नगरसेवक ज्या वेळी निवडून आले, तेव्हा जनरल सभेत ठराव पास करून शहरातील अंतर्गत रस्त्याची चौकशी व्हावी, यासाठी एक समिती गठीत करण्यात आली. या चौकशी समितीचा अध्यक्ष मी स्वत: होतो, तर पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे, विजय पाटील, मनोज भगत हे सदस्य होते. या चौकशी समितीला सर्व नगरसेवकांनी विशेष सहकार्य केल्याने चौकशी नि:पक्ष पार पडली. या चौकशी समितीसमोर अभियंता प्रशांत पवार यांना बोलवण्यात आले होते; परंतु ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. एमबीमध्ये रस्ते खोदल्याचे दाखवण्यात आले आहे; परंतु प्रत्यक्षात रस्ते न खोदता यातील पैसे लाटण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले. काही एमबीवर मुख्याधिकारी वंदना गुळवे यांची सही नाही, म्हणजेच सदरची खोटी बिले असतील म्हणून मुख्याधिकारी यांनी सही केली नसावी. अंतर्गत रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला असून, याला सर्वस्वी मुख्याधिकारी व अभियंता जबाबदार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.अंतर्गत रस्त्यात ५१५७ क्युबिक मीटर एवढी खोदाई दाखवण्यात आली असून, यावर एकंदर २८ लाखांपेक्षा जास्त रक्कम उचलण्यात आली आहे. वास्तविक पाहता कोठेही खोदाई करण्यात आलेली नाही, असा दावा या वेळी करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी मुरु ड मुख्याधिकाऱ्यांना आदेश देऊन संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी आमच्या सर्व नगरसेवकांची मागणी असून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री तसेच अधिवेशनातसुद्धा हा प्रश्न उपस्थित होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सर्व नगरसेवकांनी सांगितले. विश्राम धाम येथे चेंजिंग रूम असावी; परंतु तिथे शौचालय नसावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून चुकीच्या जागेवर शौचालयाची निर्मिती केल्याबद्दल खंतसुद्धा व्यक्त करण्यात आली आहे. मुरु ड शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत अंतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यात आले; परंतु त्याचे पैसे जीवन प्राधिकरणाने दिले असतानासुद्धा याच कामावर नगरपरिषदेमार्फत १७ लाखांचे बिल काढण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकरणाचीसुद्धा चौकशी सुरू असल्याचे सांगितले. मनोज भगत यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी असल्याचे सांगितले.
मुरुडमधील अंतर्गत रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार
By admin | Published: June 20, 2017 6:11 AM