अलिबाग : बिनशेती दाखला प्रकरणात अपहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी आणि अन्य दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन अटळ असल्याचे बोलले जाते.सुधागड तालुक्यातील राजेंद्र लाकडचंद जैन यांच्या मालकीचे क्षेत्र बिनशेती झाल्याचे आदेश प्राप्त झाले. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून ना हरकत दाखला देण्यात आला आहे, मात्र हा दाखला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आला नाही. त्यामध्ये काही बनावट कागदपत्राचा वापर केला असल्याने या प्रकरणाची फिर्याद प्रशासकीय अधिकारी डॉ. शैलेश घालवाडकर यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दिली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दाखल्याची प्रत प्राप्त केली असता देण्यात आलेला दाखला बनावट असल्याचे समोर आले. त्यासाठी वापरण्यात आलेले जिल्हा परिषदेचे गोल सील बनावट असल्याचे डॉ.घालवाडकर यांनी फिर्यादीत उल्लेख केला आहे. याबाबतची तक्रार रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे करण्यात आल्यानंतर त्यांनी डॉ. घालवडकरांना प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले. प्राथमिक चौकशीअंती राजेंद्र जैन (सुधागड), झाहीद तापीया (अलिबाग), देवाशिष चक्रवर्ती (मुंबई), नंदिनी नार्वेकर (मुंबई) यांच्यासह अन्य आठ जणांना ना हरकत दाखले दिल्याचे समोर आले. तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. हुकूमचंद पाटोळे, पर्यवेक्षक प्रमोद थळे, आरोग्य संचालक राजेंद्र मोरे या तिघांनी मिळून एक लाख २६ हजार ६०० रुपये सरकारी खात्यात जमा केले नाहीत. त्या रकमेचा अपहार केला आहे.डॉ.पाटोळे यांचे निलंबन करण्याबाबत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी आरोग्य संचालकांना कळविले आहे. (प्रतिनिधी)
बनावट दाखला देणे पडले महागात
By admin | Published: November 27, 2015 2:16 AM