कर्नाळा अभयारण्यात प्राण्यांची संख्या वाढली कि कमी झाली? गणनेला सुरुवात
By वैभव गायकर | Published: May 5, 2023 06:02 PM2023-05-05T18:02:02+5:302023-05-05T18:02:42+5:30
बुद्धपौर्णिमेच्या दिवशी प्राण्यांच्या मोजणीला होणार प्रारंभ
वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: पनवेल सारख्या निर्माण होत असलेल्या सिमेंटच्या जंगलाजवळ असलेल्या कर्नाळा अभयारण्यामध्ये वाढलेल्या मानवी हस्तक्षेपाचा प्राण्यांच्या संख्येवर काही परिणाम झाला आहे का, गेल्या वर्षभरात वन्य प्राण्यांची संख्या वाढली की कमी झाली. अभयारण्यात नवीन कोणता प्राणी दाखल झाला आहे का? या सर्वांची उत्तरे लवकरच मिळणार आहेत. दि. ५ रोजी बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने प्राणी गणनेला सुरुवात झाली आहे.
वन विभागातर्फे दर वर्षी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी वन्य प्राण्यांची गणना केली जाते. यंदा 5 मे रोजी ही गणना सुरु झाली असून प्राणिप्रेमी रात्रभर पाणवठ्यावर बसून प्राण्यांच्या हालचाली टिपणार आहेत.याकरिता वनविभागासोबत वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या संस्था एकत्रितपणे दि.5 आणि 6 रात्रीच्या वेळेला प्राण्यांच्या हालचाली टिपणार आहेत. याकरिता कर्नाळा अभयारण्यात तीन मचाण आणि ट्रॅक कॅमेरे बसविन्यात आले आहेत.20 पेक्षा जास्त जणांचे पथक प्राण्यांची गणना करणार आहे. पनवेलपासून अवघ्या काही कि.मी. अंतरावर असलेल्या कर्नाळा अभयारण्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. लाखो पर्यटक दरवर्षी या अभयारण्याला भेट देत असतात. सुमारे 12.155 चौरस किलोमीटरच्या परिसरात हे अभयारण्य वसले आहे. स्थानिक तसेच स्थलांतरित 147 प्रजातीचे पक्षी या ठिकाणी आहेत. यामध्ये 37 प्रकारचे पक्षी हे स्थलांतरित पक्षी आहेत. विविध प्रकारच्या हिंस्र प्राण्यांचाही या ठिकाणी अधिवास आहे.बिबटे,डुक्कर,रान मांजर,भेकर,खवल्या मांजर आदी याठिकाणी यापूर्वी पाहिले गेले आहेत.या प्राण्यांच्या सध्याची स्थिती काय आहे?याबाबत माहिती मिळणार आहे.पाणथळ्या शेजारी वनविभागाने निवडलेले कर्मचारी या भागावर लक्ष ठेवून असणार आहेत.काही ठिकाणी ट्रॅक कॅमे-यांची देखील याकरिता मदत घेतली जाणार आहे.
संस्थेचे स्वयंसेवक व कर्नाळा अभयारण्यातील वनविभागाचे कर्मचारी या गणनेसाठी प्राण्यांवर लक्ष ठेवून राहणार असल्याची माहिती कर्नाळा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण राठोड यांनी दिली.कर्नाळा अभयारण्यातील एक गार्ड,एक सुरक्षा रक्षक आणि संस्थेचे सदस्य एकत्रित रात्रभर पाणवठ्याजवळ उभारल्या मचाणवर बसुन हि गणना करणार आहेत.
या ठिकाणी उभारल्या आहेत मचाण
कर्नाळा अभयारण्यात तीन मचाण उभारले असुन याठिकाणी बसुन हि गणना पार पडणार आहे.आपटा परिसर,मयूर रेस्ट हाऊस आणि डॉरमेन्ट्री या पाणवठ्याच्या ठिकाणी हि गणना पार पडणार आहे.याकरिता आधुनिक ट्रॅक कॅमेरे याठिकाणी लावले जाणार आहेत.