लोकमत न्युज नेटवर्क
अलिबाग : रायगड पोलीस भरतीत वैद्यकीय प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणात संशियत असलेले जिल्हा सामान्य रुग्णालयाचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असलेल्या अटक पूर्व जामीन सुनावणीत न्यायाधीश अशोक कुमार भिलारे यांनी डॉ सुहास माने यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आठ दिवसात सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्याची मुभा न्यायालयाने दिली असल्याने काही दिवस अटके पासून डॉ माने यांना दिलासा मिळाला आहे. नुकतीच डॉ सुहास माने यांची पदावरून उचलबांगडी झाली असून शासनाने नवी नियुक्ती दिलेली नाही आहे.
रायगड पोलीस भरती मध्ये पात्र उमेदवाराची वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी सुरू होती. यावेळी १५ मे रोजी महिला उमेदवार यांच्याकडून प्रत्येकी पंधराशे रुपये पैशाची मागणी २१ महिला उमेदवार यांच्याकडून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांच्या कार्यालयातील प्रदीप ढोबळ यांनी केली होती. या प्रकरणात ढोबळ याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर संशयाची सुई ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांच्यावर होती. ढोबळ यानेही याबाबत कबुली दिली होती. त्यांनतर डॉ माने यांची पोलीस चौकशी झाली होती. माने यांनी न्यायालयातून अटक पूर्व जामीन मिळवला होता.
अटक पूर्व जामीन बाबत शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांच्या न्यायालयात सुनावणी होती. सरकार तर्फे जिल्हा सरकारी वकील ऍड संतोष पवार तर डॉ माने यांच्यातर्फे ऍड प्रवीण ठाकूर यांनी काम पाहिले. न्यायाधीश अशोक कुमार भिलारे यांनी डॉ माने यांचा जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळला आहे. आठ दिवसात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ दिला आहे. त्यामुळे डॉ माने याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.