बोरघाटात ब्लॅक स्पॉटला संरक्षक कठड्यांचे कवच, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आयआरबीकडून लगेचच कामालाही सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 01:25 PM2023-04-17T13:25:22+5:302023-04-17T13:25:22+5:30
Borghat Black Spot: शनिवारी पहाटे बोरघाटात ढोलताशा पथकाची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १३ जण ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) निश्चित करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी बॅरिकेडिंग करण्याचे आदेश दिले होते.
खोपोली : शनिवारी पहाटे बोरघाटात ढोलताशा पथकाची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १३ जण ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) निश्चित करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी बॅरिकेडिंग करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारी सकाळी बैठक होऊन सुरक्षेच्या उपायांच्या दृष्टीने आढावा घेतला गेला व त्यानंतर लगेचच आयआरबीने त्या ठिकाणी क्रॅश बॅरियर्स बसविण्याचे काम हाती घेतले आहे, अशी माहिती खोपोलीचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी दिली.
बोरघाटात अंडा पॉइंट, शिंग्रोबाच्या वरच्या खिंडीपासून ते टाटा कॉलनी, सायमाळपर्यंत उतारावर अनेकदा बस, अवजड वाहने, रिक्षा पलटी होऊन अनेक माणसे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. डिसेंबर, जानेवारीमध्ये या ठिकाणी तीन बस पलटी झाल्या होत्या. शाळकरी मुलांच्या सहलीची बसही पलटी झाली होती. त्यामध्ये दोन विद्यार्थी दगावले होते. या प्रत्येक वेळेला व त्यापूर्वीच्या अनेक वर्षांतील शेकडो अपघातांमध्ये फक्त सुरक्षेच्या कारणांवर चर्चा होत असे. मात्र, त्यावर योग्य त्या उपाययोजनांसाठी कुठल्याही प्रकारची पावले उचलली गेली नव्हती.
धोकादायक वळणे कमी करण्यावर भर
खोपोली बस दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट दिली व त्यांचे आदेश आल्यानंतर २४ तासांच्या आत कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये काहीसे समाधान व्यक्त होत आहे. तसेच शॉर्टकट म्हणून वाहनचालक चुकीच्या पद्धतीने येतात तो रस्ताही बंद करण्यात येणार आहे. संरक्षक कठडे बसविण्याबरोबरच ज्या ठिकाणी धोकादायक वळणे कमी करता येतील त्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.