रस्त्यावर खडीचे पांघरूण
By admin | Published: June 8, 2015 04:26 AM2015-06-08T04:26:00+5:302015-06-08T04:26:00+5:30
बेकरे रस्त्यावरील खोल खड्ड्यांमध्ये खडीचा भराव टाकून रस्त्यावर पांघरून घालण्याचे काम सुरू आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये असलेला खडीचा भराव अवजड वाहनांच्या प्रवासामुळे धुळीप्रमाणे उडत आहे.
नेरळ : बेकरे रस्त्यावरील खोल खड्ड्यांमध्ये खडीचा भराव टाकून रस्त्यावर पांघरून घालण्याचे काम सुरू आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये असलेला खडीचा भराव अवजड वाहनांच्या प्रवासामुळे धुळीप्रमाणे उडत आहे. पावसाळा तोंडावर असून पाणी साचून या रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण वाढत जाईल. परिणामी येथील वाहनचालकांना तसेच ग्रामस्थांना रस्त्यावरून ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. या गंभीर समस्येकडे रायगड जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच येथील वाहनचालक तसेच ग्रामस्थांमध्ये रायगड जिल्हा परिषदेविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे .
मागील दोन वर्षांपासून नेरळ - बेकरे रस्त्याची डागडुजी केली नसल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरील डांबर उखडू लागल्याने रस्ता अरुंद होत आहे. या रस्त्याच्या डागडुजीकडे जिल्हा परिषद तसेच येथील लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे वाहनचालकांत संबंधित प्रशासनाविरोधात नाराजी आहे. नेरळ - बेकरे रस्त्याचे बांधकाम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून २००५ मध्ये करण्यात आले. तब्बल नऊ वर्षे उलटली मात्र या रस्त्याचे उत्तम दर्जाचे डागडुजीचे काम आजतागायत जिल्हा परिषदेकडून करण्यात आले नाही. बेकरे गावातील ग्रामस्थांना नेरळ तसेच रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी याच मुख्य रस्त्यातून प्रवास करावा लागतो.
या रस्त्याकडे येथील लोकप्रतिनिधीही लक्ष देत नसल्याने वाहनचालकांना खड्ड्यांतून वाहने आदळत आपटत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. (वार्ताहर)