माणगाव : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याचबरोबर कोरोनाग्रस्त रुग्णाचे निदान करणारी यंत्रणा राज्य शासन तातडीने उभारत आहे. याचाच एक भाग म्हणून माणगाव उपजिल्हा रुग्णालय कोविड-१९ साठी सुसज्ज करण्यास दीड महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेश दिले होते. या रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागास जबाबदारी देण्यात आली होती. या विभागाने ३५ ते ४० दिवसांत कोविड-१९ साठी सुसज्ज रुग्णालय तयार के ले आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता शासनाने रायगड जिल्ह्यात कोरोना रोगाचे निदान होण्यासाठी रुग्णालय तयार केले आहे. रायगड जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय अलिबाग व उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याची तयारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर माणगाव उपजिल्हा रुग्णालय इमारत खूप खराब झाली असता शासनाने सार्वजनिक विभागास अंदाजे ८० ते ९० लाख रुपये निधी उपलब्ध करून या इमारतीचे काम युद्धपातळीवर करण्यास सांगितले होते. बांधकाम विभागाने ही जबाबदारी आणि परिस्थिती लक्षात घेऊन अवघ्या ३५ दिवसांतच काम पूर्ण के ले आहे.
दिवसरात्र के ले काम
च्सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता बी.एन. बहीर, उपकार्यकारी अभियंता पी. एस. राऊत व शाखा अभियंता एस. एस. उलागडे व वैद्यकीय अधिकारी डॉ. देसाई व डॉ. इंगावले यांनी दिवसरात्र मेहनत घेत कंत्राटदारांकडून सुमारे ३५ दिवसांत उपजिल्हा रुग्णालयाच्या दोन्ही इमारतीचे नूतनीकरण करून कोविड-१९ साठी सुसज्ज रु ग्णालय तयार केले. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग माणगाव यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
दोन्ही इमारतींचे नूतनीकरण : या उपजिल्हा रुग्णालयातील दोन्ही इमारतींचे नूतनीकरण केले असून या इमारतीमधील आॅपरेशन थिएटर, वॉर्ड रूम, स्वयंपाक घर, स्वच्छतागृहाचे नूतनीकरण के ले आहे.तसेच कोविड-१९ साठी स्वॅब तपासणी रूम, कोरोनो रुग्णाकरिता वॉर्डमध्ये फेब्रिकेशनमध्ये स्वतंत्र रूम असणारे आयसोलेशन केंद्र तयार केले आहे. तसेच या रुग्णालयाची ड्रेनेज यंत्रणा व संरक्षक भिंतदेखील नवीन केली आहे. मागील इमारतीस पत्र्याची नवीन शेड तयार करण्यात आली आहे.
पोलादपूर तालुक्यातील रुग्णांची संख्या चारवरपोलादपूर : गेल्या २४ तासांत पोलादपूर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्हची संख्या एकने वाढून चारवर पोहोचल्याने तालुक्यातील धकधक वाढली आहे. १५ मेनंतर आलेल्या चाकरमान्यांना कोरोनाची बाधा झाल्याने तालुक्यातील संख्या चारवर पोहोचली आहे.
शनिवारी दुपारी कापडे येथील २ तर उमरठ येथील एक व्यक्तीला तसेच पळचिल येथील एका व्यक्तीला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या पैकी शनिवारी कापडे निवाची वाडी येथील दोन तर उमरठ येथील एक असे तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. या रिपोर्टला १२ तास होत नाहीत तोच पळचिल येथील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेने युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. पळचिल येथील व्यक्तीस २१ मे रोजी त्रास होत असल्याने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यास आले होते. त्याचे स्वॅब घेऊन कोविड-१९ टेस्ट करण्यासाठी पाठविण्यात आले होते त्याचा रिपोर्ट रविवारी आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्याची अन्य लोकांची यादी बनविण्याचे काम सुरू करण्यात आले.
पोलादपूर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या सहावर पोहोचली असून यापैकी प्रभातनगर पश्चिम मधील ६५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर त्या महिलेच्या पतीवर उपचार करत त्यांना कोरोनामुक्त करण्यात आले होते. मात्र, नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढत आहे.
गेले ३० दिवस कोणतीही लक्षणे नसताना ग्रामीण भागातील तीन गावांत चार जणांना कोरोनाची बाधा झाल्याने रहिवासी भयभीत झाले आहेत. मात्र, यामुळे प्रशासन जागृत झाले आहे.