परशुराम घाटात भली मोठी दरड कोसळली; मुंबई गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 09:57 AM2024-10-16T09:57:25+5:302024-10-16T09:57:43+5:30
घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पेढे गावालाही धोका निर्माण झाला आहे.
संदीप बांद्रे
चिपळूण : परतीच्या पावसाने मंगळवारी रात्रभर चिपळूणला झोडपले. या पावसात मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली. या घटनेमुळे दरडीकडील रस्त्याची संरक्षक भिंत व दरडीची बाजू धोकादायक झाली आहे. खबरदारी म्हणून त्या बाजूची वाहतूक बंद करून दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. हा प्रकार पहाटे पाच वाजता उघडकीस आला. घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पेढे गावालाही धोका निर्माण झाला आहे.
या घटनेची माहिती चिपळूण पोलिस आणि महसूल प्रशासनाला मिळताच अधिकाऱ्यांना परशुराम घाटात धाव घेतली. यापूर्वीही येथे भरावाचा काही भाग खचला होता. त्यानंतर खचलेल्या भागाची तातडीने डागडुजीही करण्यात आली होती. मात्र पुन्हा त्याच ठिकाणी भराव खचल्याने परशुराम घाटातील मार्ग धोकादायक बनला आहे. पावसाळ्यात याठिकाणी चोवीस तास देखरेख ठेवण्यात आली होती. तसेच दरड कोसळल्यास डंपर, जेसीबी, तैनात ठेवण्यात आले होते. मात्र परतीचा पाऊस सुरु होताच या ठिकाणची यंत्रणा काढून घेण्यात आली. अशातच मंगळवारी पहाटे मुसळधार पाऊस सुरु असतानाच जोरदार आवाज झाला. परशुराम घाटात पावसाच्या सुरुवातीलाच मोठी दरड कोसळली होती. त्यामुळे काही दिवस एकेरी मार्ग बंद ठेवला होता. त्या ठिकाणची दरड अद्याप हटविण्यात आलेली नाही. आता पुन्हा त्याच ठिकाणा पासून काही अंतरावर ही घटना घडली आहे.
केबल तुटल्याने दखल
परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळून दर्डीचा भागही पूर्णपणे ढासळला आहे त्याच ठिकाणी टेलिफोन केबल होती. मात्र संरक्षक भिंत कोसळल्याने ती केबलही तुटली. अचानक नेटवर्क गेल्याने टेलिफोन एक्सचेंजचे कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना परशुराम घाटटात संरक्षक भिंत कोसळल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने पोलीस यंत्रणा व महसूल विभागाला कळवले. त्यानंतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.