- विनोद भोईर पाली : सुधागड तालुक्यातील आपटवणे गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत कोसळून दोन वर्षे झाली तरी आजतागायत दुरुस्ती किंवा नूतनीकरण झाले नाही, त्यामुळे १०२ पटाची आपटवणे शाळा गावातील काळभैरव मंदिराच्या सभागृहात भरवली जात आहे. ही शाळा इयत्ता सातवीपर्यंत असल्याने भावशेत, भावशेत ठाकूरवाडी, आदिवासीवाडी, वारगवने, नंदुरकी, गडदवणे गावातील मुले व मुली शिक्षण घेण्याकरिता येतात. मात्र, दोन वर्षे झाली तरी इमारत न झाल्याने पालक व विद्यार्थ्यांनी शिक्षक, विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त के ली आहे.शासन शिक्षण विभागावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च झाल्याचे सांगत असले, तरी ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांच्या सुधागडात अनेक इमारती ना दुरुस्तीच्या अवस्थेत असलेले चित्र बघावयास मिळतआहे. शिक्षण खात्याच्या बेजबाबदारीचा नाहक त्रास पालकव विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.आपटवणे शाळेची इमारत कोसळून दोन वर्षे होऊन गेली तरी या शाळेच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी अधिकारी आलेच नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ व पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.शालेय इमारतीच्या नूतनीकरणासाठी पाच प्रस्ताव शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषदकडे पाठवूनही आजवर त्याची दखल घेतली नाही. या शाळेत आदिवासी व ठाकूर समाजाची मुले शिकत असल्याने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.सध्या शाळा कालभैरव मंदिराच्या सभागृहात भरत आहे. पावसाळा असल्यामुळे मुलांची बसण्याची गरसोय होत आहे, याची तत्काळ संबंधित खात्याने दखल न घेतल्यास शाळा व्यवस्थापन समिती आपटवणे व आपटवणे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ-पालक मिळून आंदोलन करणार, असा इशारा देण्यात आला आहे.
आपटवणे ११२ पटाची जिल्हा परिषद शाळा भरते मंदिरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:59 PM