अलिबाग : एक काळ असा होता की, शाळेला उन्हाळ्याची सुट्टी पडताच मुलांना उष्णतेचा त्रास होऊ नये, यासाठी त्यांचे केस कापण्याकडे पालकांचा कल असायचा; पण सध्याच्या ‘फॅशनेबल’ जगात हा कल कधीचा मागे पडला आहे. उलट शाळा सुरू असताना मुलांवर ठराविक केशरचनेचे बंधन येत असल्याने सुट्ट्यांच्या काळात पालक आपल्या मुला-मुलींना आकर्षक ‘हेअरकट’ करून देण्याकडे वळत आहेत.
पालकांचा हा नवीन कल पाहून मोठमोठी केशकर्तनालये तसेच ‘सलून’मध्ये लहानग्यांच्या केशकर्तनासाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आले आहे. शाळा सुरू असताना मुला-मुलींवर ठराविक केशरचनेचे बंधन असते. मुलांचे कानावर, मानेवर न रुळणारे केस, मुलींचे नीट बांधलेले, विशिष्ट रंगाच्या हेअरबॅण्डने सावरलेले केस अशी आचारसंहिता शाळा आखून देतात. शालेय शिस्तीचा भाग म्हणून याकडे व्यवस्थापनाकडून काटेकोर लक्ष दिले जाते. त्यामुळे पालकही वर्षभर याचे पालन होईल, याकडे लक्ष देतात; परंतु दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीत मुला-मुलींना आवडेल अशा किंवा साजेशा केशरचनेकडे पालकांचाही कल आता वाढू लागला आहे.
गेल्या काही वर्षांपासून टॅटू हेअरकटने लहान मुलांवर भलतीच जादू केलेली दिसत आहे. केसांवर वेगवेगळ्या आकारांची चित्रे काढणे म्हणजे टॅटू हेअर स्टाइल. या हेअर स्टाइलमध्ये केसांच्या मागच्या बाजूला ब्रँण्डेड गाड्यांचे लोगो, चांदणी, नावाचे पहिले अक्षर किंवा कल्ल्यांच्या बाजूंना कलाकुसरी केली जाते, अशी माहिती अलिबाग शहरातील प्रसिद्ध असलेले पॅशन सलूनमधील हेअरस्टायलिस्ट नितीश म्हात्रे यांनी लोकमतला दिली.
शाळकरी मुलांना आवडणारी अजून एक केसांची स्टाइल म्हणजे स्पाइक. ही हेअर स्टाइल पाश्चिमात्य हेअर स्टाइलचा एक भाग आहे. या पद्धतीमध्ये झिग-झाग म्हणजेच कमी-जास्त केस ठेवून स्पाइक्स करणे, डोक्यावरील भागावर मोठे स्पाइक्स ठेवून बाजूने बारीक करणे किवा कट लाइनशिवाय केस ठेवणे, आटर्न म्हणजेच केस उलटे फिरवणे असे विविध प्रकार सध्या मुलांमध्ये लोकप्रिय आहेत, असे नितीश म्हात्रे यांनी सांगितले. यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत केशकर्तनालयांनीही मुलांसाठी विविध स्टाइलच्या केस रचना करण्यात येतात.
लहान मुलांना चित्रपट, क्रिकेट, फुटबॉल आदींच्या माध्यमांतून कलाकार व खेळाडू वेगवेगळ्या केशभूषांमध्ये दिसतात. त्यामुळे आपणही असाच हेअरकट करावा, असा आग्रह ते करतात. शाळेच्या कालावधीत अशा प्रकारचे केस कापणे किंवा स्टाइल करणे शक्य होत नाही, त्यामुळे त्यांना सुट्टीत तशी केशरचना करू द्यावी लागते.- गणेश बानकर, पालक