रायगड : जिल्ह्यातील कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच त्यांचे नाव राज्यासह आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणे गरजेचे आहे. जिल्हा आणि राज्यस्तरीय कुस्तींच्या स्पर्धांसाठी आवश्यक असलेल्या निकषांप्रमाणे कुस्तीपटूंसाठी मातीचा आखाडा तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली. त्यामुळे ‘दंगल’ या हिंदी सिनेमाप्रमाणे मातीचा आखाडा आता जिल्हा क्रीडा संकुलात पाहायला मिळणार असल्याचे बोलले जाते. अलिबाग येथील जिल्हा क्रीडा संकुलातील सोईसुविधांची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच पाहणी केली. या पाहणीदरम्यान, त्यांनी खेळाडूंना व जनतेला आवश्यक असलेल्या क्रीडाविषयक देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती जाणून घेतली. याशिवाय क्रीडा संकुलातील बहुउद्देशीय सभागृह, वसतिगृहाची दुरुस्ती, संरक्षक भिंतीचे अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव तत्काळ पाठवा, असे निर्देश दिले.
जिल्ह्यातील मल्लखांब आखाडे, जिल्हा व राज्यस्तरावरील कुस्तीच्या स्पर्धांसाठी आवश्यक निकषांप्रमाणे कुस्तीपटूंसाठी मातीचा आखाडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. त्याचप्रमाणे, नव्याने ४०० मीटर लांबीचा सिन्थेटिक ट्रॅक तयार करणे, शूटिंग रेंज उभारण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. श्रीवर्धन, म्हसळा, सुधागड या तालुक्यांसाठी तालुका क्रीडा संकुल उभारणी करण्यात येत आहे. त्याबाबतच्या कामाचा माहिती तटकरे यांनी घेतली.
माणगाव येथे विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. त्या कामाचाही आढावा त्यांनी घेतला. रेवस आणि मांडवा बंदराकडे परिवहन विभागाच्या एसटी बसेस जातात. या बसेस जिल्हा क्रीडा संकुलाच्या मार्गे नेण्यात याव्यात, असे परिवहन विभागाला विनंती पत्र लिहिण्याबाबतही त्यांनी संबंधितांना सूचना केली. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक, कार्यकारी अभियंता राहुल मोरे, प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यामध्ये हौसेने खेळला जातो कुस्ती खेळ रायगड जिल्ह्यामध्ये कुस्ती खेळ हौसेने खेळला जातो. आतापर्यंत अनेक उदयोन्मुख खेळाडू दिले आहेत, क्रिडा, सामाजिक आणि राजकीय पाठबळ नेहमीच या खेळाला लाभले आहे. दरवर्षी गावपातळीपासून जिल्हा पातळीवर कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते, हा मातीतला खेळ आहे, आजही तो ग्रामीण भागातील गावागावात खेळला जात आहे, विशेष म्हणजे महिला ही खेळ खेळतात, अलिबाग येथील जिल्हा क्रिडा संकुलामध्ये मातीतील आखाडा निर्माण केला जाणार आहे.