श्रीवर्धन : व्यक्ती विकासामध्ये गुरूची भूमिका निर्णायक असते. आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवरती, सुखदु:ख, यश अपयश या सर्वांना सामोरे जाण्याचे धैर्य, सामर्थ्य, विवेकशीलता, निर्णय क्षमता या सर्व बाबींचा विकास करण्यासाठी गुरुरूपी वाटाड्या, मार्गदर्शक महत्त्वाचा असतो. माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये आईरूपी गुरूचे महत्त्व आहे, असे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
श्रीवर्धनमधील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधत, शनिवारी ‘तेजस्विनी’ व ‘सरस्वती’ पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी अदिती तटकरे यांना तेजस्विनी पुरस्काराने, तर श्रीवर्धन तालुक्यामधील निवृत्त शिक्षक आनंद जोशी, सुरेश मुद्राळे, नरहर बापट व शब्बीर खतीब यांना ‘सरस्वती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तटकरे म्हणाल्या, बालपणापासून घरातूनच सामाजिक, शैक्षणिक व राजकीय बाळकडू मिळाले. घरात आईने दिलेले संस्कार, विचारांचा निर्माण केलेला भक्कम पाया, भावी आयुष्याकडे बघण्याची दृष्टी, सक्षम मन व दूरगामी वैचारिकदृष्टी तिच्या संस्कारातून मिळाली. आज सत्ताधारी पक्षाकडून काम करत असताना, जनतेची सेवा हे ब्रीदवाक्य ठेवून खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते आहे. आईच्या संस्कारामुळे रायगड जिल्ह्यावरती आलेल्या विविध संकटांचा सामना करताना बळ प्राप्त झाले, असे तटकरे यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रातील चार दिग्गज व्यक्तींचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले. आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात ते पुन्हा एकदा नवीन आयुष्याला सुरुवात करून समाजासाठी कार्य करतील, याचा मला विश्वास आहे, असे तटकरे यांनी सांगितले.