क्रेटा कारची स्कुटीला धडक! पती-पत्नी दोघांचाही मृत्यू; ५ वर्षीय मुलगी गंभीर, आरोपीचे पलायन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 07:15 PM2024-04-07T19:15:15+5:302024-04-07T19:16:06+5:30
शनिवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या एक क्रेटा कारने स्कूटीला जोरदार धडक दिली.
मधुकर ठाकूर
उरण: क्रेटा कारचालकाने एका एक्सेस स्कुटीला दिलेल्या जोरदार धडकेत पती -पत्नी दोघांचाही मृत्यू झाला आहे. तर पाच वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.उरण रेल्वे स्थानकासमोर असलेल्या प्रवेशद्वाराला लागुनच असलेल्या रस्त्यावर शनिवारी रात्री हा भीषण अपघात घडला आहे. याप्रकरणातील वाहन चालकाने रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांला मारहाण, शिवीगाळ करून घटना स्थळावरुन पोबारा केला आहे. शनिवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या एक क्रेटा कारने स्कूटीला जोरदार धडक दिली.
या धडकेत स्कुटीवर असलेले पवित्र बराल (४०), पत्नी रश्मीता बराल (३४) आणि पाच वर्षीय मुलगी परी असे तिघेही गंभीररीत्या जखमी झाले होते.जखमी पती पवित्र बराल यांचे येथील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात तर पत्नी रश्मीता बराल यांचे एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.गंभीर अवस्थेत जखमी असलेल्या पाच वर्षीय परीला ठिकाणी ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे.बेलापुर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान उरण रेल्वे स्थानकाबाहेरच्या प्रवेशद्वारावरील रस्त्यावर झालेल्या भीषण अपघाताचा आवाज ऐकून कामावर असलेले रेल्वे पोलिस कर्मचारी अतुल राजेंद्र चौहान हे प्रवेशद्वारावर धावून आले होते.भीषण अपघाताची दृश्य पाहून त्यांनाही दरदरून घाम फुटला होता.
मात्र क्रेटा कारचा चालक जय चंद्रहास घरत रा.म्हातवली याने रस्त्यावर निपचित पडलेल्या तीघांना हटविण्यासाठी या रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली.त्यांच्या वर्दीची कॉलर पकडून मारहाण केली. शिवीगाळ केली आणि घटना स्थळावरुन पोबारा केला.याप्रकरणी रेल्वे पोलिस कर्मचारी अतुल राजेंद्र चौहान यांनी उरण पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला अद्यापही अटक करण्यात आली नसल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.