क्रिकेटर सिद्धेश लाड झाला आक्षीकर, आक्षी येथे खरेदी केली दहा गुंठे बागायती जागा
By राजेश भोस्तेकर | Published: March 20, 2024 02:34 PM2024-03-20T14:34:54+5:302024-03-20T14:35:30+5:30
ऍड महेश म्हात्रे यांनी सिद्धेश याच्या मालमत्ते बाबत काम पाहिले आहे.
अलिबाग : क्रिकेट जगतातील आघाडीचे क्रिकेटर यांना अलिबागची भुरळ पडली आहे. यात अजून एक क्रिकेटर हा अलिबाग मधील आक्षिकर झाला आहे. रणजी पटू, आय पी एल तसेच गोवा क्रिकेट मधून खेळणारा तसेच समालोचक असणारा सिद्धेश लाड याने आक्षी येथे दहा गुंठेची जागा खरेदी केली आहे. अलिबाग दुय्यम निबंधक कार्यालयात सिद्धेश याने आज आपल्या मालमत्तेची नोंदणी केली आहे. ऍड महेश म्हात्रे यांनी सिद्धेश याच्या मालमत्ते बाबत काम पाहिले आहे.
अलिबाग तालुका हा निसर्गाने नटलेला आहे. त्यामुळे अनेकांना अलीबागच्या सौंदर्याची भुरळ पडलेली असते. उद्योजक, राजकारणी, अभिनेते यासह आघाडीचे क्रिकेटर हे अलिबागकर झाले आहेत. सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, रोहित शर्मा, विराट कोहली, रवी शास्त्री, दिनेश कार्तिक या क्रिकेटर यांनी अलिबाग मध्ये मालमत्ता घेतलेली आहे. त्यामुळे अलिबाग मध्ये आघाडीचे क्रिकेटर हे अलिबागकर बनले आहेत. तर अनेक क्रिकेटर भविष्यात अलिबागकर होण्याच्या मार्गावर आहेत.
रणजी, आय पी एल खेळणारा आघाडीचा क्रिकेटर सिद्धेश हा सुध्दा आता अलिबागकर झाला आहे. मुंबई इंडियन्स, कोलकत्ता मधून सिद्धेश हा आय पी एल खेळला आहे. फलंदाज आणि बॉलिंग असे दोन्ही मध्ये सिद्धेश हा उत्तम खेळाडू आहे. मुंबई संघाचा रणजी चा कप्तान ही सिद्धेश राहिलेला आहे. सध्या तो गोवा क्रिकेट तर्फे खेळत आहे. अलिबाग तालुक्यातील नारळी पोफळीच्या बागा असलेल्या आक्षी गावात सिद्धेश याने दहा गुंठ्याची बागायती मालमत्ता खरेदी केली आहे. यामध्ये छोटे घरही आहे. अलिबाग दुय्यम निबंधक कार्यालयात येऊन सिद्धेश याने नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे.