फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा; बनावट कागदपत्राद्वारे जमीन विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:08 PM2019-12-16T23:08:59+5:302019-12-16T23:09:03+5:30
उपसरपंचासह भूमाफियांची दादागिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : कर्जत तालुक्यातील ममदापूर येथे एका जमिनीची बोगस मालक उभा करून विक्री केल्याचा प्रकार येथील भूमाफियांनी केला आहे. ही बाब माहित नसलेली जमिनीची मालक असलेली महिला जेंव्हा आपल्या मालकीच्या जमिनीत झोपडी बांधायला गेली तेंव्हा या भूमाफियांनी तिला मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली आहे. मुख्य म्हणजे या भूमाफियांमध्ये ममदापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाचा समावेश असल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान या शेतकरी महिलेने याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मागील काही वर्षात नेरळ व परिसरात बिल्डर लॉबीच्या नजर खिळल्याने या परिसरातील जमिनींना सोन्याचा भाव मिळू लागला. मात्र त्यातून पुढे फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले. अनेक एजंट भूमाफिया बनून एखाद्या जमिनीचा बोगस मालक उभा करून जमिनीची विक्री करू लागले. याबाबत नेरळ व कर्जत पोलीस ठाण्यात तक्रारी वाढू लागल्याचे चित्र असताना तालुक्यातील ममदापूर येथे देखील असाच प्रकार समोर आला आहे.
ममदापूर येथील जमिनीच्या सुरेखा दुणदा शेंडे या मालक आहेत. या जमिनीची ममदापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच जुबेर पालटे, मो.सुहेल हमीद आरबीवाला व तजमुल नजे यांनी सन १९९५ साली बोगस महिला उभी करून विक्री केली होती. या तिघांनी शेंडे या अशिक्षित असल्याचा फायदा घेऊन खोट्या महिलेला उभी करून दुय्यम निबंधक येथे खोटे दस्तऐवज सादर करून विक्री केली होती. हि बाब माहित नसलेल्या शेंडे यांनी आपल्या जागेत झोपडी बनवायला गेल्या. या वेळी तिघांनीही त्यांची झोपडी तोडून शेंडे व त्यांचा भाऊ राजू मारुती शिंगे याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे शेंडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे कर्जत न्यायालयाने फिर्यादीची बाजू समजावून घेत नेरळ पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार नेरळ पोलिसांनी जुबेर सिकंदर पालटे, मो.सुहेल हमीद आरबीवाला व तजमुल नजे यांच्याविरुद्ध फसवणूक मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.