अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्रात अनधिकृतरीत्या प्रवेश केल्याने शेकापच्या तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदारावर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष पाटील, आमदार धैर्यशील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे अशी त्यांची नावे आहेत.
२३ मे रोजी रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील क्र ीडा संकुलामध्ये सुरू होती. मतमोजणी परिसरात प्रवेश करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्राद्वारेच प्रवेश दिला जात होता.२३ मे रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष पाटील (पंडित), आमदार धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे हे चार जण मतमोजणी ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले. या वेळी चारही आमदारांकडे निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र नव्हते. या वेळी अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रेय निघोट यांनी चारही आमदारांना ओळखपत्र नसल्याने आत जाण्यास मज्जाव केला. त्या वेळी आम्ही आमदार आहोत, असे बोलून पोलीस अधिकाऱ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी केंद्रात प्रवेश केला. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या बाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना कारवाईचे आदेश दिले होते, त्यानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.एकाला केली मारहाण२३ मे रोजी आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष पाटील (पंडित) यांनी सुमारे ३० कार्यकर्त्यांसह अनधिकृत मतमोजणी केंद्रात प्रवेश केला होता. या वेळी पत्रकार हर्षद कशाळकर यांना जयंत पाटील, सुभाष पाटील, अभिजित कडवे यांच्यासह अन्य ३० जणांनी मारहाण केली. याबाबत अलिबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला.