नवी मुंबई : घराची कागदपत्रे हरवल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी अडीच हजाराची मागणी केल्याप्रकरणी सिडकोच्या कार्यालयीन सहायक विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे उप अधीक्षक रमेश चव्हाण यांच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे.
राजदत्त पाटील असे सिडकोच्या कार्यालयीन सहाय्यकाचे नाव आहे. त्याने तक्रारदार व्यक्तीकडे ३ हजारांची लाच मागितली होती. तक्रारदार यांच्या घराची कागदपत्रे हरवली होती. त्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांनी सिडकोकडे अर्ज केला होता, मात्र राजदत्त याने प्रमाणपत्र देण्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी करून अडीच हजारावर तडजोड केली होती. ही रक्कम शिपायामार्फत स्वीकारली जाणार होती. याची तक्रार प्राप्त होताच नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने तपास करून गुन्हा दाखल केला आहे.