Crime News: कुटुंबातील २२ जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नवघर गावातील वाळीत प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 02:23 PM2022-06-25T14:23:00+5:302022-06-25T14:23:25+5:30
Crime News: पेण तालुक्यातील नवघर गावातील वाळीत टाकलेल्या चार कुटुंबातील २२ जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी रोखले. त्यानंतर या कुटुंबांना अलिबाग पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
अलिबाग : पेण तालुक्यातील नवघर गावातील वाळीत टाकलेल्या चार कुटुंबातील २२ जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी रोखले. त्यानंतर या कुटुंबांना अलिबाग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
रायगड जिल्ह्यात गावामध्ये दोन गटात तंटा निर्माण झाला की एका गटाला वाळीत टाकण्याच्या घटना घडल्या आहेत. आजही वाळीत टाकण्याचे प्रकार घडताना दिसतात. पेण तालुक्यातील नवघर गावात देवाच्या पालखी सोहळ्यात तंटा निर्माण झाला होता. यावेळी काही कारणास्तव देवेंद्र कोळी आणि त्याच्या चार कुटुंबांना गावाने वाळीत टाकले होते. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी या कुटुंबाबरोबर स्नेह संबंध तोडले होते. याबाबत वाळीत कुटुंबांनी प्रशासनाकडे अर्जही केली होती. प्रशासनाने दोन्ही गटात सुलाह करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र तो झालेला नव्हता. त्यानंतर पुन्हा पेण उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी बैठक घेऊन हा प्रश्न सोडविला होता. त्यानंतर चार महिने सर्व एकोप्याने राहत होते. मात्र पुन्हा ग्रामस्थांनी या कुटुंबांना वाळीत टाकले होते. त्यामुळे या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शुक्रवारी आत्मदहनासाठी चार कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
अलिबाग पोलीस निरीक्षक शैलेश सणस, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी या कुटुंबाला प्रबोधन करून आत्महत्येचा विचार डोक्यातून काढला. त्रास देणाऱ्याबाबत आपण लेखी तक्रार देऊन कायदेशीर कारवाई केली जाईल असेही सांगितले. त्यानुसार पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ पुढील कायदेशीर कारवाई करणार आहेत.