खोपोली : ठेकेदारीवरून वाद झाल्याने दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवन्हावे येथे घडली आहे. या हाणामारीत ६ जण जखमी झाले असून परस्पर विरोधी तक्र ारी दाखल करण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी सर्व परिस्थिती कौशल्याने हाताळल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेला लागून देवन्हावे ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेल्या ट्रक टर्मिनल कामाच्या ठेक्यावरून हा वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हाणामारीत जखमी झालेल्या ६ जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेलगत मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर देवन्हावे ग्रामपंचायतीच्या हद्दीत पालीफाटा येथे ट्रक टर्मिनलचे काम सुरू आहे. सागर लुकआऊट ही कंपनी हे काम करत असून या कंपनीने भरावाचे काम मुखत्यार धनसे यांना दिले आहे. या ठिकाणी आपल्यालाही काम मिळावे असा प्रयत्न हनिफ दुदुके व त्यांचे सहकारी करत होते. मंगळवारी दुदुके आपल्या सहकाऱ्यांसह काम सुरू असलेल्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी धनसे व दुदुके यांच्यामध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत अजित दुदुके, हनिफ दुदुके, इकबाल खोत, रमेश बोर्ले, नितीन धारणे गंभीर जखमी झाले. या सर्वांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हाणामारीत मार लागल्याने रक्तदाबाचा त्रास होत असल्याने मुखत्यार धनसे यांनाही वाशी येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ठेकेदारीवरून दोन्ही गटात हा वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. मुखत्यार धनसे व हनिफ दुदुके राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असल्याने पोलीस ठाणे व खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयासमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्र ारी दाखल केल्या आहेत.
ठेकेदारीवरून दोन गटांत हाणामारी
By admin | Published: March 31, 2016 2:40 AM