तरुणावर मगरीचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 10:58 PM2019-12-17T22:58:05+5:302019-12-17T22:58:10+5:30
गंभीर जखमी : सावित्री नदीपात्रालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण
म्हसळा : तालुक्यातील पांगळोली येथील मच्छीमार फैजान मयनुद्दीन धनसे (१९) हा तरुण सावित्री नदीच्या पात्रात मच्छीमारी करीत असता मगरीच्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झाला. याबाबतची माहिती म्हसळा वनविभागाचे कोंझरी परिमंडळचे वनाधिकारी बाळकृष्ण गोरनाक यांनी दिली. या घटनेमुळे सावित्री नदीच्या पात्रालगतच्या गावांमध्ये तसेच मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेची माहिती फैजानचे वडील मयनुद्दीन यांनी म्हसळा वनविभागाला दिली होती. त्यानुसार बाळकृ ष्णगोरनाक यांच्या समवेत वनरक्षक अतुल आहिरे, दिलीप वाधे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सावित्री नदीपात्रात कोंझरी, कोळे, तोराडी, पांगळोली, निगडी (ता. मंडणगड-रत्नागिरी) या परिसरांतील मच्छीमार मोठ्या प्रमाणात जीव धोक्यात टाकून मच्छीमारी करीत असतात.
शुक्रवार, १३ डिसेंबर रोजी सायं.५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान पांगळोली येथील मच्छीमार फैजान व त्याचा मित्र मुझफ्फर अ. र. धनसे हे दोघे कोंझरी गावानजीक काळवी, गडदाब या सावित्री नदीला मिळणाऱ्या खाडीत मच्छीमारी करत असताना मगरीने फैजानवर प्राणघातक हल्ला करून त्याचा डाव्या पायाचा गुडघा निकामी केल्याची घटना घडली. मिरज येथील रु ग्णालयात फै जानवर उपचार सुरू आहेत.
या भागातील खाडींचा भाग निमखाºया पाण्याचा आसल्याने या खाडीत मगरींना वास्तव्यासाठी पोषक वातावरण आहे, गेल्या काही वर्षांत या परिसरात मगरींची संख्या वाढली आहे. मगर मांसाहारी असून मासे हे तिचे मुख्य अन्न आहे. पक्षी व जमिनीवरील प्राणी हेही ती खाते. पाणी प्यायला आलेली गुरे लहान वासरे यांवर झडप घालून मगर शिकार करते. यासाठी स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे. वनविभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या परिसरात जनजागृतीचे बोर्ड लावणार आहोत.
- नीलेश पाटील, परिक्षेत्र वनाधिकारी, म्हसळा