पेण : तालुक्यातील शेतकरी कष्टकरी असून यावर्षी दोनवेळा आलेल्या महापुरात आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यातच शेतीची अतीवृष्टी व महापूराने पूर्ण विल्हेवाट लावली होती. उध्वस्त झालेल्या शेतीकडे हताश नजरेने पहात न शेतक-यांनी त्यावेळीच खरीपाच्या उत्पन्नाची आशा सोडून दिली होती. मात्र शेतजमीनीला हिरवी साडी परिधान करायची या वेड्या आशेने इकडून तिकडून पीक गोळा करुन लागवड केली.
सरकारच्या महसूल यंत्रणेने त्या वेळी नुकसान पहाणी दौराकरून बाधीत झालेल्या शेतीमधून ७० टक्के नुकसान झाल्याचे पहाणी अहवाल तयार केला होता. सप्टेबर महिन्यामधील हा अहवाल होता. त्यानंतर आक्टोबर, नोव्हेंबर महिन्यापर्यंत परतीचा पाऊस व समुद्रात आलेल्या क्यार, महाचक्रीवादळमुळे शिवारात जे उरलेल ३० टक्के पीक होत ते सुध्दा पावसाने हिरावून नेल्याने आता शेतकऱ्यांना सरकारी मदतीची आशा आहे. पेणमध्ये १०० टक्के शेती नुकसानीचा अहवाल तयार झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पंचनामे युध्दपातळीवर करण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी कर्मचारी, ग्रामसेवक यांची पथके कार्यरत झाले आहेत.महाचक्रीवादळ येणार असल्याच्या भीतीने शेतात जे काही बाकी राहिलं आहे, ते भातपीक थोडे थोडे कापून शेताच्या बांधावर झोडणी करुन शेतकरी धान्य घरी नेण्यासाठी धावपळ करताना शिवारात दिसत आहेत. पावसाने झालं तेवढ खूप नुकसान झालं; त्यात पदरी खाण्यापूर्त तरी मिळावं या अपेक्षे ही शिवारात सुरू असेली धावपळ दिसून येत आहे. २०१५-१६ नंतर २०१६-१७ व २०१७-१८अशा तीन वर्षांत निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतक-यांना नुकसान सोसावे लागले होते. सरकारी मदतीचा हात म्हणावा तसा मिळाला नव्हता. मात्र गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न मिळाले होते. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ रकमेपैकी दोन हजार रुपयांचे दोन हप्ते शेतक-यांच्या बँक खात्यात जमा झालेत. याचा लाभ ५० टक्के शेतक-यांना मिळाला आहे; मात्र ५० टेक्के शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहेत. सरकारी यंत्रणेला याकामी पूर्ण वेळ मिळाला नाही. अतिवृष्टी, महापूर, वादळी वाऱ्यांसह जोरदार पडणा-या पावसाने शेतकरी देशोधडीला लागला आहे.