कोट्यवधींचे प्रकल्प रखडले, पाटबंधारे प्रकल्पाकडे सरकारचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 06:49 AM2018-04-06T06:49:24+5:302018-04-06T06:49:24+5:30
श्रीवर्धन तालुक्यातील विविध पाटबंधारे प्रकल्प अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहेत त्यामुळे उन्हाळ्यात तालुक्यातील अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते.
- संतोष सापते
श्रीवर्धन - तालुक्यातील विविध पाटबंधारे प्रकल्प अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहेत त्यामुळे उन्हाळ्यात तालुक्यातील अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. तालुक्यातील वडशेत वावे व मारळ या धरणाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. शासन दरबारी योग्य पद्धतीने कार्यतत्परता दाखवल्यास या धरणाचे पाणी श्रीवर्धन शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या रानवली धरणापर्यंत पोहचू शकते, पर्यायाने उन्हाळ्यात निर्माण होणारा पाणीप्रश्न निकाली निघू शकतो.
अद्याप वडशेत वावे धरणग्रस्तांमध्ये काही लोकांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालेला नसल्याची तक्रार शेतकºयांची आहे. वडशेत वावे धरणाला जोडून कालव्याचे खोदाईचे काम पूर्ण झाले आहे, परंतु धरण अर्धवट अवस्थेत असल्याने त्याचा उपयोग शून्य आहे.
वडशेत वावे पाटबंधारे प्रकल्प अतिशय मोठा आहे. धरणाच्या पाठीमागे असलेल्या भागात नैसर्गिक जलस्रोत आहेत.धरणाच्या बंधाºयांचे काम काही अंशी करण्यात आले आहे.पण आतील भागातील जमीन वनखात्याची असल्याकारणाने ते खोदकाम पूर्ण होऊ शकलले नाही. हा प्रकल्प चांगल्या उंचीवर असल्याने श्रीवर्धन तालुक्यातील अनेक भागात कालव्याने पाणी नेणे सहज शक्य आहे. धरणाचे काम पूर्णत्वास गेल्यास वडशेत वावे, साखरी, जावेळे,धारवली, कोलमांडला व गालसुरे ही गावे ओलिताखाली येऊन भातशेती व भाजीपाल्याची शेती मोठ्या प्रमाणात होऊ शकते. धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्यास आजूबाजूच्या परिसरातील विहिरीच्या जलपातळीमध्ये देखील वाढ होऊ शकते.
दुसरा प्रकल्प हरिहरेश्वरजवळील मारळ गावाच्या हद्दीत सुरू करण्यात आला होता,तो सुद्धा अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी स्थानिक शेतकºयांच्या जमीन ताब्यात घेतल्या, परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला.धरण पूर्ण झाल्यास पिण्याचा पाणीप्रश्न निकाली निघेल असा भाबडा आशावाद स्थानिक शेतकरी वर्ग बाळगत होता. मारळजवळच दक्षिण काशी समजले जाणारे हरिहरेश्वर हे प्रसिद्ध तीर्थस्थळ आहे. तेथे भाविक व पर्यटक यांची सदैव गर्दी असते. ऐन उन्हाळ्यात मात्र हरिहरेश्वरमध्ये पाण्यासाठी त्राही भगवान परिस्थिती निर्माण होते. मारळचा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास बागमांडला, भेंडखोल, कुरवडे, मोहितेवाडी, गडबवाडी, केळेवाडी व हरिहरेश्वर या आजूबाजूच्या अनेक गावांना मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते. राज्याच्या जलसंपदा विभागाने कोट्यवधी रु पयांची उधळण करत या प्रकल्पाचे काम सुरू केले होते, परंतु अद्याप या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाºया नद्या उन्हाळ्यात कोरड्या पडल्याचे भयाण परिस्थिती आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम बनणे गरजेचे आहे. शेतीस पूरक उपाययोजना करणे आवश्यक आहे. विद्यमान राज्य सरकारने तरी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पावले उचलावीत अशी अपेक्षा आहे.
माझी पाच एकर जमीन धरण प्रकल्पात गेली.अद्याप धरण झाले नाही, शिवाय मोबदला म्हणून केवळ पंचाहत्तर हजार रु पयेच मिळाले.त्यामुळे प्रचंड नैराश्य आले आहे.
- मधुकर सावंत, प्रकल्पग्रस्त शेतकरी
अद्याप चालू वर्षात कुठल्याही ग्रामपंचायतीने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली नाही. गावाने मागणी केल्यास तत्काळ पूर्तता केली जाईल.गेल्या वर्षी चार गावे व नऊ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला होता.
- सी. बी. हंबीर, सहा. गटविकास अधिकारी श्रीवर्धन