मधुकर ठाकूरउरण : उरण परिसरातील जेएनपीटी, कोटनाका, मोरा, जासई विभागातून कोरोनाचे सत्र अद्यापही पुरते थांबलेले नाही. खारकोपर ते उरण परिसरात फेरफटका मारताना ६० टक्के नागरिक नियमांचे काटेकोरपणे पालन करीत नसल्याचे आढळून आले आहे.
बाजारपेठा, मासळी मार्केट, भाजीपाला मंडईत खरेदीसाठी नागरिकांची दररोज गर्दी उसळते. या गर्दीमुळे बाजारपेठेला दररोज यात्रेचे स्वरूप असते. खरे तर गर्दीला आवर घालण्यात प्रशासनही अपयशी ठरत आहे. यामुळे उरण परिसरात कोरोना आता गावोगावी जाऊन पोहोचला आहे. दिवाळीच्या सणानंतर विवाहाचे मुहूर्त सुरू झाले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन दरम्यान रखडलेले साखरपुडा, हळदी-लग्न उत्सव, समारंभ धडाक्यात साजरे करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या सोहळ्यातही नागरिक कुठेही सामाजिक अंतर, मास्क आदी नियमांचे पालन करताना दिसत नाहीत.
लॉकडाऊन काळात केवळ सामाजिक अंतराचे पालन केले जात नसल्यानेच उरण परिसरात कोरोना रुग्णांची संख्या सव्वादोन हजारांपार पोहोचली आहे. कोरोना हे जगावरचे संकट आहे. त्यामुळे जगभरात आर्थिक मंदीचे सावट पसरले आहे.
प्रशासनाकडून आवश्यकतेप्रमाणे खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल. - भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार, उरण