राबगाव/पाली - वर्षातील पहिल्या अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी पाली येथील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली होती. अंगारकीनिमित्त बल्लाळेश्वराची मूर्ती व गाभाऱ्याच्या आतील भाग झेंडू व आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता. अष्टविनायकाचे स्थान असलेल्या पालीत महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने गणेश भक्तांची दिवसभरात रेलचेल होती. तसेच यावेळी वेगवेगळ्या ठिकाणांहून दर्शनासाठी अनेक भाविक पायी चालत आले होते.बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक पदयात्रा आणि पालख्या घेवून भाविक दर्शनासाठी आले होते. दर्शनासाठी मोठ्या भक्तिभावाने आलेल्या भाविकांनी बल्लाळेश्वराच्या चरणी आपले नवस फेडले. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना देवस्थानतर्फे रांगेत उभे राहण्यासाठी रेलिंग व छताची सोय करण्यात आली आहे. तसेच त्यांना शुद्ध थंड पाणी व प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक भाविक सोमवारी मध्यरात्रीपासून दाखल झाले होते. देवस्थानच्या दोन भक्तनिवासामध्ये भाविकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाली पोलिसांनी व बल्लाळेश्वर देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पाली पोलीस ठाण्याच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. कार व दुचाकी पार्किंगसाठी देवस्थानच्यावतीने भक्तनिवास एक येथे व्यवस्था करण्यात आली होती. अंगारकीनिमित्त मंदिर परिसरात हार, प्रसाद, पेढे, पेठा, खेळणी,कडधान्य यांची दुकाने सजली होती. संपूर्ण परिसरास यात्रेचे स्वरूप आले होते.
पालीमध्ये बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 6:45 AM