बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; पालीत वाहतूककोंडीची डोकेदुखी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 11:30 PM2018-11-18T23:30:44+5:302018-11-18T23:32:21+5:30
दिवाळी सुट्यांमुळे अष्टविनायकाचे स्थान असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत भाविकांची गर्दी होत आहे. सध्या दररोज जवळपास पाच हजार भाविक बल्लाळेश्वराचे दर्शन घेत आहेत.
पाली : दिवाळी सुट्यांमुळे अष्टविनायकाचे स्थान असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत भाविकांची गर्दी होत आहे. सध्या दररोज जवळपास पाच हजार भाविक बल्लाळेश्वराचे दर्शन घेत आहेत. त्यामुळे हॉटेल, दुकानदारांचा व्यवसाय तेजीत आहे. भाविकांच्या गाड्यांमुळे पालीत वाहतूककोंडी होत आहे. परंतु पाली पोलीस व देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात तरी अरुंद रस्त्यांमुळे परिस्थिती जैसे थे होते.
मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले असून यात्रेचे स्वरूप आले आहे. परिसरातील हॉटेल, खेळण्यांची व शोभिवंत वस्तूंची आणि खाऊची दुकाने, नारळ, हार , फुले व पापड मिरगुंड विक्रं ते, सरबतवाले, प्रसाद व पेढेवाले आदींचा व्यवसाय चांगला होत आहे. अनेक भाविक स्वत:ची वाहने घेवून येतात, यामुळे पालीमध्ये वाहतूककोंडी होत आहे.
वाहतूककोंडी सुटता सुटेना
अरु ंद रस्ते, नो एन्ट्रीमधून जाणारी वाहने, मोठ्या वाहनांची रेलचेल, वाहतुकीचे नियम मोडणारे वाहनचालक आदी कारणांमुळे पालीत वारंवार वाहतूककोंडी होते. सुट्यांमुळे मोठ्या प्रमाणात गाड्या व बसेस पालीत दाखल होत आहे. अरु ंद रस्त्यांमुळे दोन्ही बाजूने आलेल्या वाहनांना जाण्यासाठी जागा मिळत नाही. परिणामी वाहने अडकून पडून वाहतूककोंडी होते. अशा वेळी पोलिसांचे प्रयत्न असफल ठरतात. या वाहतूककोंडीचा त्रास पादचाऱ्यांना सुद्धा होतो. मंदिर परिसरात देखील अवैधरीत्या पार्क केलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडी होते. त्यामुळे भाविकांची गैरसोय होते.
मंदिरासमोरील तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. रंगीत कारंजे लावण्यात आले आहेत. बल्लाळेश्वर ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना राहण्यासाठी दोन सुसज्ज भक्त निवास आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रेलिंग व शेड उभारण्यात आले आहे. देवस्थानचे दोन पार्किंग देखील आहे.
- अॅड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली