खोपोली : होळीला लागून आलेल्या सलग सुट्यांमुळे मुंबईकर मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्याने रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाल्याचे चित्र गेले चार दिवस पहायला मिळत आहे. अनेक पर्यटन स्थळे व समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. अष्टविनायकांपैकी एक ठिकाण असलेल्या महड येथील वरदविनायकाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रविवारी पहाटेपासूनच रीघ लागली होती. संकष्ट चतुर्थी असल्याने महड येथे मोठी गर्दी केली होती. श्री गणपती संस्थान महडच्या वतीने भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.खालापूर तालुक्यातील महडचा वरदविनायक नवसाला पावत असल्याने दर्शनासाठी भाविकांची महडमध्ये नेहमीच गर्दी असते. अष्टविनायकांपैकी एक ठिकाण असलेल्या महडला गेल्या चार दिवसांत हजारो भाविकांनी भेट देवून वरद विनायकाचे दर्शन घेतले आहे. होळीनंतर सलग आलेल्या सुट्यांमुळे भाविक मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने गेली तीन दिवस दर्शनासाठी गर्दी वाढली असून, आज तर विक्र मी गर्दी असल्याची माहिती श्री गणपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त केदार जोशी यांनी दिली. (वार्ताहर)बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रांगाच रांगापाली : मार्च महिन्यात सलग चार दिवस सुटी आल्याने बहुतांश नोकरदारवर्गाने पर्यटनाबरोबरच देवदर्शन, पिकनिक स्पॉट इत्यादी ठिकाणी फिरण्याला प्राधान्य दिले आहे. रविवारी संकष्ट चतुर्थी असल्याने बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पाली येथील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली. कडक उन्हात देखील भाविकांच्या चेहऱ्यावर खूपच उत्साह दिसत होता, तर मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. बल्लाळेश्वर मंदिराच्या ट्रस्टीने आलेल्या भाविकांना वेळेत व सुरक्षित दर्शन घेता यावे यासाठी चोख व्यवस्था केली होती. तसेच पाली शहरात होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी पाली शहरात वाहतूक कोंडी होऊ न देता वाहतूक सुरळीत ठेवून आलेल्या भाविकांना सहकार्य केले.
वरदविनायक, बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
By admin | Published: March 28, 2016 2:19 AM