विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची गर्दी; चोख पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 11:23 PM2019-09-13T23:23:46+5:302019-09-13T23:23:55+5:30

रोहा तालुक्यातील पाच सार्वजनिक तर ९९४ खासगी गणरायांच्या मूर्तींचे विसर्जन

Crowd of devotees to watch the immersion procession; Accurate police settlement | विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची गर्दी; चोख पोलीस बंदोबस्त

विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची गर्दी; चोख पोलीस बंदोबस्त

Next

रोहा : रोहा तालुक्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी एक हजार बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. रोहा तालुक्यात ५ सार्वजनिक तर ९९४ खाजगी गणरायांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले असल्याची माहिती रोहा पोलीस ठाण्याचे एम. जी. काळे यांनी दिली. रिमझिम पावसात विसर्जन मिरवणुकांचा जल्लोष पाहण्यासाठी रोहा बाजारपेठेत तुडुंब गर्दी झाली होती.

सार्वजनिक गणपती मंडळांची विसर्जनासाठीची लगबग दुपारनंतर सुरू झाली होती. मोरे आळी, अंधार आळी आणि धनगर आळी असे एका मागून एक सार्वजनिक आणि खाजगी गणपती विसर्जनासाठी नदी किनारी काढण्यात आले. यामध्ये रोह्याचा राजा एक गाव एक सार्वजनिक गणपती, जय गणेश मंडळाचा भुवनेश्वरचा राजा, शहरातील प्रख्यात शेडगे बंधू, साळवी बंधू आदि गणपतींच्या भव्य विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी रोहा बाजारपेठेत गर्दी उसळली होती.

बाप्पांच्या मूर्तींचे कुंडलिका नदीपात्रात भावपूर्ण आणी भक्तिमय वातावरणात विसर्जन केले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यासाठी विशेष पोलीस कुमकही शहरात मागविण्यात आली होती. विसर्जनात श्रीसदस्य, रोटरी क्लब सदस्यांनी निर्माल्य संकलनासह सेवाभावी मदतकार्य केले.

विसर्जनात खड्ड्यांचे विघ्न आणि फटाक्यांचे प्रदूषण!
विसर्जन मार्गावर मुख्य हमरस्ता, नाना शंकर शेठ रस्ता, बाजारपेठ, फिरोज टॉकीज आदी ठिकाणी पावसाने पडलेल्या खड्ड्यांचा गणेशभक्तांना त्रास सहन करावा लागला. मिरवणुकांच्या जल्लोषात अनवाणी ढोल वादक आणि नृत्यमग्न भाविकांच्या पायाला रस्त्यावरील खडीने व खड्ड्यांनी जखमाही झाल्या. पर्यावरणपूरक सण साजरे व्हावेत यासाठी जनजागृती होत असताना विसर्जन मिरवणुकीतील फटाक्यांच्या आतषबाजीने गुरुवारी रोहा बाजारपेठ प्रदूषित झाली. मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांना धूराचा त्रास सहन करावा लागला.

कर्जतमध्ये १०९७ गणेशमूर्तींचे विसर्जन
कर्जत तालुक्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी १०९७ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यंदा पावसामुळे विसर्जन करताना भाविकांची तारांबळ उडाली. तसेच कर्जत पोलीस ठाण्यात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन शुक्रवारी करण्यात आले. आता एकवीस दिवसांच्या गणरायाचे विसर्जन शिल्लक आहे. कर्जत तालुक्यातील कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक १२, खाजगी ४२४, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक एक, खाजगी ६३२ माथेरानच्या हद्दीतील सार्वजनिक एक, खाजगी २७ अशा एकूण १०९७ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

पेणमध्ये बाप्पांवर पुष्पवृष्टी
पेण तालुक्यातील एकूण सार्वजनिक १० व घरगुती २३६८ गणपतींना वाजत गाजत सवाद्य मिरवणुकांनी उत्साहात विसर्जन स्थळावर भक्तजणांनी निरोप दिला. पेण शहरातील गणेशमूर्तींचे येथील भोगावती नदीच्या विसर्जन घाटावर तर ग्रामीण भागातील ग्गणेशमूर्तींचे त्या त्या गावातील नदीपात्रात व तलावात तसेच खाड्यांमध्ये विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुकांनी रस्ते फुलून गेले होते. पेण शहरात रोटरी क्लब व अन्य सेवाभावी संस्थाच्या वतीने गणेशभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था के ली होती. नंदीमाळ नाका येथे पेण नगरपालिके नेस्वागत कक्ष उभारून विसर्जनासाठी निघालेल्या बाप्पांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

महाडमध्ये गणरायाला भावपूर्ण निरोप
महाड : तांबट आळी, सरेकर आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नवी पेठ बालमित्र, नूतन मित्र, शिवप्रेमी नवेनगर ,बालाजी मंदिर मंडळ, जिजामाता भाजी मार्केट गणेशोत्सव मंडळ, गुजर आळी सार्वजनिक मंडळ आदी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांंच्या तसेच खाजगी गणरायांंचे विसर्जन रात्री साडेदहा वाजेपर्यंत सुरुच होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

म्हसळ्यात खासगी ८५० गणरायांना निरोप
म्हसळा तालुक्यातील दहा दिवसांच्या सुमारे ८५० घरगुती आणि म्हसळा शहरातील बंजारी समाजाच्या एकमेव सार्वजनिक गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला.त्यामध्ये म्हसळा शहरातील, सुरई, म्हसळा आदिवासी वाडी, म्हसळा गौळवाडी येथील सुमारे १०० ते १२५ बाप्पांचा समावेश आहे. वाजत गाजत काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीत शहरातील आबालवृद्ध सारेच उत्साहात सहभागी झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.

नेरळच्या गणेश घाटावर स्वच्छता मोहीम
नेरळ येथील गणेश घाटावर घरगुती आणि सार्वजनिक गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी घरगुती ५००हून अधिक मूर्तीचे विसर्जन झाले. नेरळ ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात येत होते. विसर्जन सोहळा गणेश घाटाबरोबरच नेरळमधील घरोघरी पोहचविण्यासाठी केबलद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अलिबाग यांच्यावतीने निर्माल्य आणि प्लॅस्टिक जमा करून स्वच्छता मोहीम राबविली. चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Crowd of devotees to watch the immersion procession; Accurate police settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.