गणेश पंचायतन मंदिरात गर्दी
By admin | Published: February 1, 2017 12:34 AM2017-02-01T00:34:31+5:302017-02-01T00:34:31+5:30
समुद्रातील कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन प्राचीन आणि राज्यातील एकमेव अशा गणेश पंचायत मंदिरात माघ शुद्ध विनायकी चतुर्थी श्री गणेश जयंती माघी गणेशोत्सवाचे
अलिबाग : समुद्रातील कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन प्राचीन आणि राज्यातील एकमेव अशा गणेश पंचायत मंदिरात माघ शुद्ध विनायकी चतुर्थी श्री गणेश जयंती माघी गणेशोत्सवाचे मंगळवारी प्रतिवर्षीप्रमाणे कुलाबा किल्ला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजन केले होते. नवसाला पावणारे आणि मनोकामना पूर्ण करणारे हे गणेश पंचायतन असल्याची मोठी श्रद्धा भाविकांमध्ये असल्याने राज्यभरातून भाविक दर्शनाकरिता आले होते. नवस फेडण्याकरिता भाविकांनी सोमवारी रात्रीच किल्ल्यात मुक्कामास येवून पहाटे पाच वाजता महापूजा झाल्यावर गणेश पंचायतनचे दर्शन घेवून आपले नवस फेडले.
कुलाबा किल्ला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अलिबाग शहरातील दानशूरांच्या सहयोगातून येथे दरवर्षी येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद (भोजन) देण्याचा उपक्रम करते. कोळी समाज आणि शहरातील सुमारे २५० भाविक हा महाप्रसाद गणेश सेवा या भावनेतून तयार करीत असतात. यंदा ५० हजारपेक्षा अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती मंडळाचे सदस्य बाळाराम भगत यांनी दिली.
अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आंग्रेकालीन ‘गणेश पंचायतन’ मंदिर अलिबागच्या समुद्रातील कुलाबा किल्ल्यात आहे. किल्ल्यातील पोखरणीच्या (तलावाच्या) पश्चिमेस हे गणेश मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी दगडी चौथऱ्यावर उजव्या सोंडेचा श्री सिद्धिविनायक गणपती, पुढील बाजूस डावीकडे ‘सांब’ तर उजवीकडे ‘विष्णू’ आणि मागील बाजूस डावीकडे ‘सूर्य’ तर उजवीकडे ‘देवी’ अशा एकूण पाच मूर्तींच्या या समूहास गणेश पंचायतन असे संबोधले जाते. संपूर्ण काळ्या दगडातील हे मंदिर थोरल्या राघोजी आंग्रे यांनी बांधले. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस कार्तिकस्वामी व उजव्या बाजूस गणपतीची प्रतिमा आहे. मंदिराचे सभागृहसुद्धा अष्टकोनी असून येथे आल्यावर भाविकांना एक आगळी शांती प्राप्त होत असल्याचे दर्शनास आलेल्या काही भाविकांनीच सांगितले. अलिबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी बंदोबस्त उपलब्ध करुन दिला होता. (विशेष प्रतिनिधी)
वरदविनायकाच्या जन्मोत्सवासाठी भाविकांची गर्दी
वावोशी : महड येथील गणपती मंदिरात श्री वरदविनायकाचा जन्म सोहळा साजरा करण्यात आला. सकाळी श्री गणपती संस्थान महडचे विश्वस्त सिद्धार्थ विनायक जोशी यांच्या हस्ते श्रींची महापूजा करण्यात आली, तर पुणे येथील कपणाने यांचे सुश्राव्य असे कीर्तन पार पडले. गणेश जन्मानंतर नवसाचा नारळ घेण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाल्याचे चित्र पहायला मिळत होते. मंदिरामध्ये काढलेली आकर्षक रांगोळी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. वरद विनायक फूल रांगोळी मंडळ यांनी रांगोळी साकारली होती. रांगोळी काढण्यासाठी १५० किलो फुलांचा वापर करण्यात आला. ही रांगोळी काढण्यासाठी वीस तास लागले. दर्शनरांग दोन किमीपेक्षा लांब गेली होती.