गणेश चोडणेकर
आगरदांडा : पावसाळ्यात वर्षासहलीचा आनंद लुटण्यासाठी मुरुड तालुक्यातील निसर्गरम्य सवतकड्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ लागल्याने सुट्टीच्या दिवशी येथे मोठी गर्दी होऊ लागली आहे. एका बाजूला उंचच्या उंच कडा, त्यातून फेसाळत खाली येणारे पाणी तर दुसऱ्या बाजूला धुक्याचे अच्छादन घेतलेली खोल दरी हा निसर्गाचा नजराणा पाहताना स्वर्गसुखाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. येथील निसर्ग न्याहाळताना अनेकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. पावसाळ्यात कोकणाचे सौंदर्य अधिकच खुलते. येथील निसर्गाचा अनुभव घेण्यासाठीच शहरी पर्यटक मोठी गर्दी करू लागले आहेत.
मुरुड तालुक्यातील सायगाव या गावांपासून तीन किलोमीटर अंतरावर सुरुवात होते. घनदाट वृक्षराजीतून या रस्त्यावरून या धबधब्यावर जाता येते. या रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या डोंगरातून खळखळ करत वाहणाºया दुधाळ धबधब्यांची रांग आपले लक्ष वेधून घेते. प्रत्येक धबधबा आपल्याला मोहित करत असतो. जसजसे आपण रस्त्यावर जातो, तसतसा थंड हवेचा झोका मन उल्हासित करू लागतो. दरीत पसरलेल्या दाट धुक्यामुळे दरीत डोकावून पाहिले तर काहीही दृष्टीस पडत नाही. मात्र, दरीतील धुके जेव्हा वर येऊ लागते, तेव्हा निसर्गाची चंदेरी चादर कुणीतरी वर घेऊन येत असल्याचा भास होतो. थोडे पुढे गेल्यावर उंच कड्यातून अवखळपणे कोसळणारे दुधाळ धबधबे आपले लक्ष वेधून घेतात. रस्त्यावरून चालताना धबधब्याचे अंगावर उडणारे पाण्याचे तुषार रोमांचित करतात.वावडुंगी ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणीवावडुंगी ग्रामपंचायतीने सवतकडा धबधब्यावर जाण्याकरिता रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी दिशादर्शन फलक लावल्यास पर्यटकांना व स्थानिकांना धबधब्यावर पोहोचण्याकरिता त्रास होणार नाही. त्यामुळे पर्यटकांची व स्थानिकांच्या संख्येत वाढ होईल आणि स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य- नम्रता कासार व सरपंच-हरी भेकरे यांनी यांची दखल घेऊन कोणत्या खात्यामार्फत रस्त्याकरिता निधी मिळून देता येईल व पर्यटकांची संख्या कशी वाढवता येईल याकडे पाहिले पाहिजे. पर्यटक वाढले तर यामधून स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. सध्या शासकीय नोकºया उपलब्ध नाहीत. आपल्या गावातच कसा रोजगार वाढेल याकडे पाहिले पाहिजे, असे मत मुरुडचे निसर्गप्रेमी नितीन डोंगरीकर व समीर कंरदेकर यांनी व्यक्त केले, तसेच याकरिता ग्रामपंचायतीकडे रीतसर निवेदनही देणार आहोत.