मुरुड : रविवार सुट्टीचा दिवस असल्याने हजारोच्या संख्येने पर्यटक ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहाण्यासाठी आपल्या कुटुंबासह आल्याने या ठिकाणी प्रचंड गर्दी पाहावयास मिळाली. कोल्हापूर, सोलापूर, यवतमाळ, पुणे, सातारा, मुंबई व ठाणे येथून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी होती. रविवारी सकाळपासूनच जंजिरा किल्ला पाहाण्यासाठी राजपुरी येथील जुन्या जेट्टीवर पर्यटकांच्या लांबच लांब रांगा दिसून येत होत्या. लोक शिडांच्या बोटीमध्ये बसून जंजिरा किल्ल्यावर जात होते.
गर्दीवर नियंत्रण ठेवणे, तसेच बोटीमध्ये किती माणसे बसविली जावी याचे सर्व अधिकार मेरी टाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे असतानाही रविवार सुट्टी म्हणून हे अधिकारी फिरकले नाहीत. पर्यटकांची संख्या वाढल्याने येथील जेट्टीवर सरबत गोळा, शहाळी, टोपी व गॉगल विक्रेते या सर्व दुकानांवर मोठी गर्दी झाल्याने स्थानिकांना चांगला रोजगार मिळाला. राजपुरी येथील नवीन जेट्टीवर वाहनांसाठी असणाºया पार्किंग झोनमध्ये वाहनेच वाहने बघावयास मिळत होती.
हजारोच्या संख्येने पर्यटक आल्याने वाहनांच्या रांगा या अगदी राजपुरी ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत आल्या होत्या. पर्यटकांच्या मोठ्या चारचाकी वाहनांमुळे राजपुरी येथील निमुळत्या रस्त्यांमुळे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे व अरुंद रस्ता यामुळे ज्या वेळी पर्यटकांची संख्या वाढते, तेव्हा अशी वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात दिसून येते, तरीसुद्धा यातून मार्ग काढत लोक जंजिरा किल्ल्यापर्यंत पोहोचत होते.
शिडांच्या बोटीमधून प्रवास करून लोक किल्ला गाठताना दिसत होते. पुरातत्त्व खात्याने नुकतेच प्रती प्रवासी २५ रुपये शुल्क आकारणी सुरू केल्याने त्यांनासुद्धा पर्यटकांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा महसूल मिळत आहे. रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने काशीद व मुरुड येथील समुद्रकिनाºयांवर पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळली. यामुळे हॉटेल व लॉजिंग हाउसफुल्ल झाले आहेत.