दासगाव : कोकणातील पाऊस आणि पावसाळ्यात फेसाळणारे धबधबे पर्यटक आणि निसर्गप्रेमींकरिता कायम पर्वणीच राहिली आहे. यावर्षी थोडा उशिरानेच पाऊस हजर झाला असला तरी आता महाड आणि पोलादपूरमधील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. यामुळे या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी उसळू लागली आहे. महाडजवळील केंबुर्ली गावाजवळ असलेला धबधबा महामार्गावरून जाणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. महाड आणि पोलादपूर हे दोन तालुके तळकोकणाचे प्रवेशद्वार असल्याने ऐन पावसाळ्यात निसर्गाने या दोन तालुक्यांवर सौंदर्याची उधळण के ली आहे. महाड तालुक्यात शहराजवळच केंबुर्ली गावाजवळ महामार्गावर असलेला धबधबा आता ओसंडून वाहू लागला आहे. हा धबधबा महामार्गावरील पर्यटकांचे कायम आकर्षण राहिला आहे. या ठिकाणी आता पर्यटकांची गर्दी होत आहे. महाडप्रमाणेच किल्ले रायगड मार्गावर कोतुर्डे धरणाचे पाणी ज्या ठिकाणी पलटते त्या ठिकाणी मोठा धबधबा आहे. येथे जवळच नदी असून हा धबधबा प्रचंड उतारावरून नदीला मिळत असल्याने तसा धोकादायक आहे. रायगड मार्गावर कोंझर गावाजवळ घाटमार्गावर दोन धबधबे पर्यटकांसाठी आकर्षण ठरले आहेत. महाडजवळील मांडले गावाजवळ असलेला धबधबा देखील खुला झाला आहे. मांडले गावाजवळील धबधब्यावर तरुणांची गर्दी दिसून येत आहे. या मार्गावर कोंझर गावाच्या वरील बाजूस असलेल्या घाटरस्त्यावर जागोजागी छोटे-मोठे धबधबे आहेत. सुरक्षेची काळजी घ्यावीमहाड आणि पोलादपूरमधील या धबधब्यांवर प्रशासनाने खबरदारीचे फलक लावणे गरजेचे आहे. शाळा, कॉलेज चुकवून येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे देखील पालकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पोलादपूरपासून पुढे महाबळेश्वर असल्याने या मार्गावर देखील पावसाळ्यातील अनेक धबधबे तयार झाले आहेत. महाड आणि पोलादपूरमधील धबधबे हे आनंदासाठी सुरक्षित असले तरी कधीकधी पर्यटकांचा अतिरेक याठिकाणी दिसून येत आहे. या धबधब्यांवर मद्याच्या बाटल्या खाली होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महामार्गावर असलेल्या धबधब्यावर पोलीस गस्त लावली आहे. शिवाय मद्य पिवून धांगडधिंगा घातल्यास कारवाई केली जाईल. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना कोणताच त्रास होवू दिला जाणार नाही, मात्र पर्यटकांनी देखील सामाजिक जाणीव ठेवून पर्यटनाचा आनंद घ्यावा. - ए.वाय.मलिक, पोलीस उपनिरीक्षक,महाड
कोकणातील धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी
By admin | Published: July 07, 2016 2:17 AM